राशीद खान आणि मोहम्मद नबीने तालिबानशी घेतला पंगा, त्या फतव्यावर थेट व्यक्त केली नाराजी
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राज्य आहे. तालिबानच्या राज्यात कारभारही तसाच आहे. महिलांना तर दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे रोज काही ना काही फतवे निघत असतात. असं असताना एका फतव्याविरुद्ध क्रिकेटपटू राशीद खान आणि मोहम्मद नबीने आवाज उचलला आहे.
अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशीद खानचा जगभरात नावलौकीक आहे. जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर राशीद खानने कायम आपल्या देशात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीसाठी आवाज उचलला आहे. त्याला अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीची साथ मिळाली आहे. तालिबाने महिलांसाठी एक फतवा काढला आहे. या फतव्या या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंनी विरोध केला आहे. तालिबान सरकारमधील मंत्री हिबतुल्लाह अखुंदजदाने 2 डिसेंबरला अफगाणिस्तानमध्ये महिलांना मेडिकल ट्रेनिंग घेण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. काबुलमध्ये नर्सिंगचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना इंस्टिट्यूटमध्ये जाण्यास रोखलं होतं. यावर राशीद खानने थेट सोशल मिडिया पोस्ट करून खरी खोटी सुनावली आहे. तसेच या फतव्याने निराश असल्याचं सांगितलं आहे.
‘अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी मेडिकल संस्था बंद करण्याच्या निर्णयामुळे मी खूपच निराश आहे. इस्लाममध्ये पुरुष आणि महिला या दोघांना शिक्षण घेणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे. या निर्णयामुळे त्यांच्या भविष्यासोबत समाजावरही व्यापक परिणाम होईल. सोशल मीडियावर त्या ज्या पद्धतीने आपलं दु:ख सांगत आहेत. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर संघर्ष स्पष्टपणे दिसत आहे. अफगाणिस्तान, आमची मातृभूमी, एका महत्वपूर्व वळणावर येऊन ठेपली आहे.’, अशी पोस्ट राशीद खानने लिहिली आहे.
🤲🏻🤲🏻🇦🇫🇦🇫 pic.twitter.com/rYtNtNaw14
— Rashid Khan (@rashidkhan_19) December 4, 2024
‘देशाला प्रत्येक क्षेत्रात विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रोफेशनल्सची नितांत गरज आहे. महिला डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता चिंताजनक आहे. कारण याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्य सेवेवर होतो. आमच्या भगिनी आणि मातांना खऱ्या अर्थाने समजणाऱ्या वैद्यकीय प्रोफेशनलकडून मदत मिळणे आवश्यक आहे. अफगाण मुलींना त्यांचा शिक्षणाचा हक्क परत मिळावा आणि देशाच्या विकासात हातभार लावता यावा यासाठी मी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन करतो. सर्वांना शिक्षण देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर एक नैतिक जबाबदारी आहे.’, असंही राशीद खानने पुढे लिहिलं आहे.