रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मर्मावर ठेवलं बोट, बीसीसीआयकडून खरंच अशी चूक झाली का?
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 3-1 ने दारूण पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ट्रॅक कायम ठेवणं जमलं नाही. यामुळे मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीतील संधी दोन्ही गमावलं आहे. असं असताना रवि शास्त्री यांनी टीम इंडिया आणि बीसीसीआयच्या मर्मावर बोट ठेवलं आहे.
टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये दोन मालिकेत वाताहत झाली आहे. आठ कसोटी पैकी फक्त एका कसोटी जिंकता आलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 ने गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 3-1 मात खावी लागली. यामुळे टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी बीसीसीआयला आरसा दाखवला आहे. मोहम्मद शमीबाबत निर्णय घेण्यात बीसीसीआयने चूक केल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. रवि शास्त्री यांनी सांगितलं की, ‘मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियात नेलं असतं तर मेडिकल टीमने त्याची काळजी घेतली असती. टीम इंडियासोबत ठेवलं असतं आणि त्याचं रिहॅब टीमसोबतच झालं असतं. तिसऱ्या कसोटीनंतर मोहम्मद शमी खेळण्यालायक नसता तर त्याला पुन्हा पाठवता आलं असतं. पण त्याला बरोबर नेऊ शकले असते.’ इतकंच काय मोहम्मद शमीबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिजिओचा सल्लाही घेता आला असता.
रवि शास्त्री यांनी पुढे सांगितलं की, ‘मीडियात येणाऱ्या बातम्या पाहून मी आश्चर्यचकीत होत होतो की नक्की शमीला झालंय काय. रिकव्हरी होणार की नाही. तो किती दिवसांपासून एनसीए आहे हे मला माहिती नाही. तो कुठे याची माहितीही नीट मिळू शकलेली नाही. तो त्याच्या क्षमतेचा खेळाडू असता तर मी त्याला ऑस्ट्रेलियात आणले असते.’ इतकंच काय मोहम्मद शमी संघात असता तर जसप्रीत बुमराहवरील दबाव कमी झाला असता. ऑस्ट्रेलियात पॅट कमिन्सच्या सोबतीला स्कॉट बोलँड आणि मिचेल स्टार्क होते.
मोहम्मद शमीने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याने रणजी स्पर्धेत भाग घेतला. तसेच मुश्ताक अली स्पर्धेत बंगालकडून खेळला आणि फिट असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियात शेवटचे दोन सामने खेळेल असं वाटत होतं. पण तसं काहीच झालं नाही.