नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीम इंडियाच्या पराभवाला आता चार दिवस झाले आहेत. पण अजूनही टीम इंडियाचे चाहते हा जिव्हारी लागणारा पराभव विसरलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये टीम इंडियावर 209 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंग-बॉलिंगशिवाय टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या काही निर्णयांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
कॅप्टन रोहित शर्माने मॅचच्या पहिल्यादिवशी ढगाळ हवामान आणि हिरवागार पीच पाहून टॉस जिंकताच पहिली गोलंदाजी स्वीकारली होती. रोहितने या टेस्टमध्ये नंबर 1 टेस्ट स्पिनर रविचंद्रन अश्विनला न खेळवून मोठी चूक केली.
अश्विनने या सर्व विषयावर मौन सोडलय
WTC च्या दुसऱ्या सायकलमध्ये टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात रविचंद्रन अश्विनने महत्वाची भूमिका बजावली होती. पण फायनलच्या प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळालं नाही. अश्विनला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं नाही, त्यावर बरीच चर्चा झाली. कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड यांच्यावर टीका झाली. आता स्वत: अश्विनने या सर्व विषयावर मौन सोडलय.
अश्विन काय म्हणाला?
फायनलसाठी प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळाल्याने दु:ख झाल्याच अश्विनने सांगितलं. मला या बद्दल 48 तास आधीच समजलं होतं, असं अश्विन म्हणाला. “मला फायनलमध्ये खेळायच होतं. कारण टीमला इथपर्यंत पोहोचवण्यात माझही योगदान होतं. मागच्या WTC फायनलमध्ये मी चांगली गोलंदाजी केली होती. 4 विकेट घेतले होते. 2018-19 नंतर परदेशात खेळताना मी चांगली कामगिरी केलीय” असं अश्विन म्हणाला. इंडियन एक्सप्रेसला त्याने ही मुलाखत दिली.
‘फायनलआधी हेच त्यांच्या डोक्यात असावं’
“टीमसाठी मी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिले आहेत. मी याकडे कोच आणि कॅप्टनच्या दृष्टीकोनातून बघतोय आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. याआधी आम्ही जेव्हा शेवटच इंग्लंडमध्ये गेलो होतो, तेव्हा टेस्ट सीरीज 2-2 ने ड्रॉ झाली होती. त्यावेळी चार पेसर आणि एक स्पिनर विनिंग कॉम्बिनेशन असल्याच लक्षात आलं होतं. कदाचित फायनलआधी हेच त्यांच्या डोक्यात असावं” असं अश्विन म्हणाला.
दिग्गजांच्या समर्थनावर अश्विन काय म्हणाला?
अश्विनला फायनलमधून वगळण्याच्या निर्णयावर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांसारख्या दिग्गजांनीही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. अनेक दिग्गजांनी माझ्याबद्दल असा विचार केला, हे वाचून बर वाटलं, असं अश्विन म्हणाला. “मी टीममध्ये फिट बसतो, हा विचार त्यांनी माझ्याबद्दल केला, याचं मला समाधान आहे. पण वास्तवात मला खेळण्याची संधी मिळाली नाही आणि ट्रॉफी सुद्धा” अशी खंत अश्विनने बोलून दाखवली.