RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवासाठी दोन खेळाडू जबाबदार! सोशल मीडियावर चाहत्यांनी मांडला लेखाजोखा
आयपीएल 2024 स्पर्धेतील उत्कंठावर्धक सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने चेन्नईला 200 धावांच्या आत गुंडाळलं आणि प्लेऑफचा मार्ग प्रशस्त केला. पण चेन्नईच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची कारणं चाहत्यांनी शोधून काढली आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने या पराभवाचं विश्लेषण करत आहे. चला जाणून घेऊयात चाहत्यांच्या मते या पराभवासाठी कोण जबाबदार ते
आयपीएल 2024 स्पर्धेतील 68 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात दोन्ही सघांना विजय महत्त्वाचा होता. मात्र सर्व गणितं सोडवत आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना हा पराभव पचनी पडत नाही. सोशल मीडियावर या पराभवाचं जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने विश्लेषण करत आहे. सामना कुठे फिरला आणि कोण जबाबदार याचा लेखाजोखा मांडत आहे.या सामन्यावर पावसाचं सावट होतं. पहिल्या डावाची तीन षटकं झाल्यानंतर पाऊस पडला. त्यामुळे सामन्याचं चित्र काही वेगळंच असेल अशी धाकधूक होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यानंतर पाऊस काही पडला नाही. तसेच 20 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आरसीबीने 20 षटकात 5 गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. खरं तर चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी फक्त 201 धावांची गरज होती. पण चेन्नईला 7 गडी गमवून 20 षटकात फक्त 191 धावा करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं ते महत्त्वाचे गोलंदाज आणि फलंदाज यांची गैरहजेरी..महत्त्वाच्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व शार्दुल ठाकुरकडे आलं होतं. अनुभवी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने या सामन्यात आपली लय गमावली. हेच संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. या सामन्यात शार्दुलने 4 षटकात 61 धावा देत 2 बळी घेतले. यॉर्कर टाकायच्या नादात अधिक फुल टॉस गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा आरसीबीने घेतला.
आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सला दोन धक्के बसले. पण रहाणे आणि रचिन रविंद्र यांनी चांगली भागीदारी करत धावगती कमी होऊ दिली नाही. पण या दोन विकेट पडताच चेन्नईचा डाव गडबडला. स्फोटक फलंदाज शिवम दुबे याने महत्त्वपूर्ण सामन्यात विजयी खेळी खेळली नाही.रहाणेच्या विकेटनंतर दुबेला कामगिरी पुढे चालू ठेवण्यात अपयश आले. इतकंच काय तर 61 धावांची खेळी खेळणारा रचिन रवींद्र शिवम दुबेशी संवाद नसल्यामुळे रनआउटचा बळी पडला. इतकंच काय तर दुबे 15 चेंडूत 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
लांब आणि उत्तुंग षटकारासाठी ओळख असलेला शिवम दुबे चिन्नास्वामीसारख्या छोट्या मैदानात झेलबाद झाला. त्यामुळे शार्दुल ठाकुर आणि शिवम दुबेच्या खराब कामगिरीमुळेच संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं असं चाहत्यांचं म्हणणं आहे. चाहते सोशल मीडियावर या दोघांना दोषी धरत आहेत.