RCB vs LSG : कोहली आणि गंभीर यांच्याविरुद्ध कोणत्या नियमांतर्गत कारवाई? जाणून घ्या आयपीएल नियमावलीबाबत
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन बीसीसीआयने दोघांना दंडही ठोठावला. पण बीसीसीआय नेमकी शिक्षा कशी ठरवते? जाणून घ्या
मुंबई : आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली असताना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा ठरला आहे. सामन्यानंतर झालेली बाचाबाचीने सर्वांचं लक्ष वेधलं. आयपीएल 2023 मधील ही सर्वात मोठी घडामोड ठरली आहे. नेमकं काय झालं असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याचबरोबर काही आजी माजी खेळाडूंनी खडे बोलही सुनावले आहे. असं सगळं सुरु असताना बीसीसीआयचे आयपीएलच्या नियमावलीनुसार विराट आणि गंभीर विरोधात कारवाई केली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या सामना फी मधून 100 टक्के दंड ठोठावला आहे. मग बीसीसीआय हे मोघम ठरवते की खरंच असा काही नियम आहे? जाणून घ्या
गंभीर आणि कोहलीकडून 2.21 या नियमाचं उल्लंघन
आयपीएल स्पर्धेतील सामन्यात खेळाडूंकडून गैरवर्तन होऊ नये यासाठी बीसीसीआयने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीला आयपीएल कोड ऑफ कंडक्ट असं संबोधलं जातं. सामन्यात एखाद्या खेळाडूने उल्लंघन केलं तर या नियमांतर्गत कारवाई केली जाते. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात या नियमावलीचं उल्लंघन झाला. विराट आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेची दखल बीसीसीआयने घेतली आणि नियम 2.21 नुसार कारवाई केली.
काय आहे आयपीएल नियम 2.21
आयपीएल कोड ऑफ कंडक्टमधील 2.21 हा नियम खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वादामुळे खेळाचं नाव खराब झाल्यास हा नियम लागू होतो. विराट आणि गंभीर वादामुळे असंच काहीसं झालं आहे. या नियमांतर्गत जाणीवपूर्वक डिवचणे, अश्लिल टिका करणे यांचा समावेश आहे. भर मैदानात विचित्र कृती करणे यात नमूद आहे. अर्थात विराट आणि गंभीर या दोघांनी या नियमाचं उल्लंघन केलं आणि त्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
गंभीर आणि विराटला किती दंड ठोठावला
विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या वादाला कारणीभूत ठरले. बीसीसीआयने या प्रकरणी तिघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी दंडात्मक कारवाई म्हणून कोहलीला 100 टक्के सामना फी भरण्याचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच 1.07 कोटी रुपये भरावे लागतील. तर गौतम गंभीरला 100 टक्के सामना फी म्हणजेच 25 लाख रुपये भरायचे आहेत.
नवीन उल हकला सामन्याच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 1.79 लाख रुपये दंड ठोवण्यात आला आहे. तिघांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे कोणतीच सुनावणी होणार नाही.