IPL 2023, RCB vs MI | मुंबईचा लाजिरवाणा पराभव, आरसीबीचा 8 विकेट्सने धमाकेदार विजय
मुंबई इंडियन्सने आरसीबीला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान सहज पूर्ण केलं. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आपली छाप सोडता आली नाही.
बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 5 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16 व्या मोसमातील सुरुवात विजयाने केली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 16.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. आरसीबीकडून विराट कोहली आणि फॅफ डु प्लेसिस ही सलामी जोडी या विजयाची शिल्पकार ठरली.
विराट आणि फॅफ या दोघांनी 149 धावांची सलामी भागीदारी केली आणि त्यासह विजयावर शिक्कामोर्तब केला. विराट याने नाबाद 82 धावांची खेळी केली. कॅप्टन फॅफ डु प्लेसिस याने 73 रन्स केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल 12 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून अर्शद खान आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 1 विकेट घेतली.
आरसीबी चाहत्यांचा विजयानंतरचा जल्लोष
An 8⃣-wicket victory at home to kick off the season in style ??@RCBTweets are up and running in #TATAIPL 2023 ?
Scorecard ▶️ https://t.co/ws391sGhme#TATAIPL | #RCBvMI pic.twitter.com/NlqIbjqHdC
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
मुंबईची बॅटिंग
त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये टिळक वर्मा याच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 172 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं.
मुंबईकडून टिळक वर्मा याने सर्वाधिक 46 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 9 खणखणीत चौकारांच्या मदतीने 84 धावांची नाबाद खेळी केली. टिळक व्यतिरिक्त नेहाल वाढेरा याने 21, अर्शद खान आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 15 धावा केल्या. इशान किशन 10 रन्स करुन आऊट झाला. तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
आरसीबीकडून कर्ण शर्माने 2 फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद सिराज, रेस टोपली, अक्ष दीप आणि हर्षल पटेल या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.