IPL 2024, RCB vs RR : विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर, फक्त 29 धावा करताच नवा रेकॉर्ड
आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कशी कामगिरी करेल. तसेच विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ऑरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रायल्स आमनेसामने येणार आहेत. 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ क्वॉलिफायर 2 मध्ये क्वॉलिफायर 1 मधील पराभूत संघाशी लढणार आहे. दोन्ही संघांना हा विजय खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी तेवढाच प्रयत्न करताना दिसतील. आरसीबीने सलग सहा विजय मिळवून एका चमत्काराप्रमाणे प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघ सलग 4 सामन्यात पराभूत झालेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. एकीकडे संघांच्या कामगिरीची चर्चा होत असताना विराट कोहली वेगळ्याच उंचीवर जाऊन बसला आहे. विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे त्याच्याकडून एलिमिनेटर फेरीत चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. ऑरेंज कॅपचा मानकरी असलेला विराट कोहली या सामन्यात एक विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
विराट कोहली आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळत आहे. गेली अनेक वर्षे त्याने आरसीबीचं नेतृत्वही केलं आहे. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 251 सामन्यांच्या 243 डावात 7971 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहली आयपीएलमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 29 धावा दूर आहे. एलिमिनेटर सामन्यात कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 29 धावा करताच एक विक्रम रचणार आहे.आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. विराट कोहलीने आतार्यंत खेळलेल्या 14 सामन्यात 155 च्या स्ट्राईक रेटने 708 धावा केल्या आहेत. यात 59 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये कोणत्याही फलंदाजाला इतकी मोठी कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमध्ये विराट कोहलीची सातत्यपूर्ण खेळी सुरु आहे. विराट कोहलीने आयपीएल इतिहासात 8 शतकं झळकावली आहेत. तसेच 50 अर्धशतकांचाही समावेश आहे. नाबाद 113 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे. विराट कोहलीने आयपीएल इतिहासात 702 चौकार आणि 271 षटकार ठोकले आहेत.