आरसीबी महिला आणि पुरुष संघामध्ये यंदा जुळून आला असा योग, जेतेपदावर नाव कोरणार का?
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची लढत आता रंगतदार होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर होताना दिसत आहे. कोणता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार याची उत्सुकता आहे. आरसीबीचंही जर तर गणित आहे. पण असं असताना एक शुभ योग जुळून आला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 62 वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. आता चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात प्लेऑफचं काय ते स्पष्ट होईल. बंगळुरुची या स्पर्धेतील सुरुवात काही चांगली झाली नव्हती. सलग पराभवाची मालिका सुरु होती. मात्र त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जबरदस्त कमबॅक केलं. तसेच एकापाठोपाठ एक करत पाच सामने जिंकले. तळाशी असलेल्या आरसीबीने भरीव कामगिरी करत थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. आरसीबीने 13 सामन्यात 6 सामन्यात विजय आणि 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहून 12 गुण मिळवले आहेत. तसेच नेट रनरेट +0.387 आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना 18 धावांनी किंवा दिलेलं आव्हान 18.1 षटकात पूर्ण केलं तर आरामात नेट रनरेटने चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकेल. त्यामुळे असंच काहीसं घडू दे अशी आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा आहे. कारण यावेळी वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने जेतेपद जिंकलं आहे. आता काहीसा योगायोग आरसीबी पुरुष संघासोबत जुळून आला आहे.
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबीची स्थिती चिंताजनक होती. प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल की नाही अशी स्थिती होती. पण आरसीबी महिला संघाने कमबॅक केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एका धावेने पराभव झाला होता. त्यानंतर स्मृती मंधानाच्या नेतृत्वात संघाने पुनरागमन केलं. तसेच फायनलपर्यंतचे सर्व सामने जिंकले. आता पुरुष संघासोबतही असाच योगायोग जुळून आला आहे.
आयपीएल स्पर्धेत पहिला सामना आरसीबीने गमवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. कोलकात्याविरुद्ध फक्त एका धावेने पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र त्यानंतर आरसीबीने जबरदस्त कमबॅक केलं आहे. सलग पाच सामने जिंकत दिग्गज संघांना धक्का दिला आहे. म्हणजेच या वर्षी महिला आणि पुरुष संघाने एका धावेने पराभव झाल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं आहे.