सिडनी: टीम इंडियाने आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध सामना जिंकला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधला हा दुसरा विजय आहे. भारतीय टीमने 56 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव चमकले. तिघांनी अर्धशतक झळकावली. त्यांनीच आपल्या फलंदाजीने विजयाची पायाभरणी केली.
टीम इंडियाची खराब सुरुवात
विराट कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये सलद दुसर अर्धशतक झळकावलं. तो 44 चेंडूत नाबाद 62 धावांची इनिंग खेळला. याआधी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. टीम इंडियाचा आज पहिला विकेट लवकर गेला. केएल राहुल 9 धावांवर स्वस्तात बाद झाला.
नेहमीच्या स्टाइलमध्ये चौफेर फटकेबाजी
त्यानंतर क्रीजवर आलेल्या विराटने रोहितच्या साथीने मिळून डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यकुमारने आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये चौफेर फटकेबाजी सुरु केली.
बॅटिंगने सर्वांनाच प्रभावित केलं
सूर्यकुमार नेहमीच्या शैलीत आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 25 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. सूर्याने त्याच्या बॅटिंगने सर्वांनाच प्रभावित केलं. स्टुडिओमध्ये असलेले गौतम गंभीरही त्याच्या फलंदाजीवर प्रभावित झाले.
खरा हिरो कोण?
“खरा हिरो सूर्यकुमार यादव आहे, विराट कोहली नाही. सूर्यामुळे विराट कोहलीवर दबाव राहिला नाही” असं गौतम गंभीर भारताची इनिंग संपल्यानंतर म्हणाले. टीम इंडियाने आजच्या सामन्यात पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा केल्या. नेदरलँडच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 123 धावांपर्यंत मजल मारली.