Cricket : आता क्रिकेटमध्येही मिळणार ऑनफिल्ड शिक्षा, असं केल्यास थेट रेड कार्ड दाखवून बाहेरचा रस्ता
फुटबॉल, हॉकी या सारख्या खेळांमध्ये खेळाडूने गैरवर्तन केलं की थेट त्याला रेड दाखवलं जातं. त्यामुळे त्यांना मैदानातून बाहेर बसावं लागतं. असाच नियम आता क्रिकेटमध्येही लागू होणार आहे. कसं ते समजून घ्या
मुंबई : क्रिकेट खेळात काळानुरूप अनेक बदल होत आहेत. फिल्डिंगपासून गोलंदाजी आणि फलंदाजीत बऱ्याच नियमांची भर पडली आहे. आयपीएलमध्ये तर इम्पॅक्ट प्लेयर्स म्हणून सामन्यातील स्थिती पाहून निवड केली जात आहे. आता असाच एक नियम क्रिकेट जगतावर लागू होणार आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये नव्या नियमाची भर पडणार आहे. स्लो ओव्हर रेटसाठी आता रेड कार्डचा वापर केला जाणार आहे. म्हणजेच वेळेत 20 षटकं पूर्ण केली नाहीत तर स्लो ओव्हर रेटसाठी शिक्षा मिळणार आहे. 17 ऑगस्टपासून कॅरेबियन प्रीमियर लीग सुरु होणार आहे. या स्पर्धेत नव्या नियमाची अमलबजावणी केली जाणार आहे. कोणत्याही संघाला टी20 सामन्यात एक डावात 20 षटकांचा खेळ 85 मिनिटांत पूर्ण करायचा असतो. पण कधी कधी ही वेळ निघून जाते तरी सामना संपत नाही.
काय आहे नवा नियम?
टी20 स्पर्धेत एक डाव 85 मिनिटांत संपणं आवश्यक आहे. म्हणजेच सरासरी एका षटकासाठी 4 मिनिटं 25 सेकंदाचा वेळ मिळतो. या आकडेमोडीनुसार 17 वं षटक 72 मिनिटं 15 सेकंद, 18 वं षटक 76 मिनिटं 30 सेकंद, 19 वं षटक 80 मिनिटं 45 सेकंद आणि 20 वं षटक 85 व्या मिनिटात पूर्ण होणं गरजेचं आहे. पण एखादा संघ ही वेळ पाळू शकला नाही तर मात्र वेळेनुसार संघाला शिक्षा ठोठावली जाणार आहे. म्हणजे 18 वं षटक सुरु होण्यापूर्वी स्लो ओव्हर रेट असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या एका खेळाडूला 30 यार्डच्या आत यावं लागेल. म्हणजेच चार ऐवजी पाच खेळाडू सर्कलमध्ये असतील.
19 वं षटक सुरु होण्यापूर्वी अशीच स्थिती असेल तर मात्र दोन खेळाडूंना 30 यार्डच्या आत यावं लागेल. म्हणजेच चार ऐवजी सहा खेळाडू सर्कलमध्ये असतील. 20 वं षटक सुरु होण्यापूर्वी अशीच स्थिती राहिली तर मग कर्णधाराला एका खेळाडूला बाहेर काढावं लागेल. तसेच सहा खेळाडू सर्कलमध्ये असतील.
फलंदाजी करणाऱ्या संघालाही शिक्षा होणार
सामना वेळेत संपण्याची जबाबदारी फक्त गोलंदाजी करणाऱ्या संघाची नाही तर फलंदाजी करणाऱ्या संघावरही असेल. जर फलंदाजीस उशीर झाला तर पंच पहिल्यांदा सांगतील आणि त्यानंतर अंतिम इशारा दिला जाईल. सुधारणा न दिसल्यास पाच धावा कमी केल्या जातील. आता हा नवीन क्रीडा रसिकांना कसा वाटतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील सहा संघ
- बारबाडोस रॉयल्स
- गुयाना अमेजिंग वॉरियर्स
- जमैका तालावास
- ट्रिनबागो नाइटरायडर्स
- सेंट लूसिया किंग्स
- सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स