Rishabh Pant : ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी
ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीवरुन रुडकीला जाताना भयानक रस्ते अपघात झाला. या अपघातामुळे पंतला मारला लागला. जीवाला धोका उद्भवेल अशी कोणतीही जखम पंतला झाली नाही.
मुंबई : आगामी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने टीम इंडियाने प्लानिंग केली आहे. त्यानुसार सर्वकाही सुरु आहे. या वर्ल्ड कपचं यजमानपद हे भारताकडे आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळावी आणि कुणाला नाही याबाबतची चर्चा सुरु आहे. मात्र सर्वात चिंताजनक बाब ही आहे की टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि बॅट्समन ऋषभ पंत पूर्णपणे फीट होणार का? पंतचा भीषण रस्ते अपघात झाला. पंतला या अपघातात जबर दुखापत झाली. पंतच्या अपघातामुळे प्रत्येक चाहता हा चिंतेत आहे. त्यात टीम इंडियाची निराशा वाढवणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप तर सोडाच पंतला या वर्षात पुन्हा मैदानात उतरता येणंही अवघड असल्याचं म्हटलं जात आहे.
ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीवरुन रुडकीला जाताना भयानक रस्ते अपघात झाला. या अपघातामुळे पंतला मारला लागला. जीवाला धोका उद्भवेल अशी कोणतीही जखम पंतला झाली नाही. पण पंतच्या गुडघ्याला आणि बाकी ठिकाणी फार मार लागला. त्यामुळे पंतला मैदानात परतायला वेळ लागेल, हे निश्चित झालं. काही दिवसांपूर्वीच पंतवर मुंबईतील कोकिलाबने अंबानी हॉस्पिटलमध्ये लिगामेंट शस्त्रक्रिया पार पडली. ज्यामुळे पंत लवकरच मैदानात परतेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती.
आता पंतबाबत नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार पंतवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया होणार आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, पंतच्या पायात 3 लिगामेंट टीयर आहेत. त्यापैकी 2 लिगामेंटवर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र अजून एकदा ऑपरेशन होणं बाकी आहे. या ऑपरेशनसाठी पंतला 6 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागू शकते.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयला पंतच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली आहे. त्यानुसार, पंत किमान क्रिकेटपासून 6 महिने लांब राहिल असं म्हटलं आहे.
रिपोर्टनुसार, पंतच्या 3 लिगामेंटमध्ये फार मार लागला होता. ज्यापैकी 2 लिगामेंटवर ऑपरेशन झालं आहे, तर तिसऱ्यावर ऑपरेशन व्हायचं आहे. हे 3 लिगामेंट पायांच्या हालाचालींसाठी आणि स्थिरता देण्यात निर्णायक ठरतात. साधारणपणे लिगामेंट सर्जरीनंतर त्यातून पूर्णपणे रिकव्हर व्हायला बराच वेळ लागतो. शस्त्रक्रियेनंतर फिजीओने दिलेल्या आज्ञांचं पालन करावं लागतं, ज्यामुळे लवकरात लवकर बरं होण्यास मदत होते. त्यामुळे पंतला या वर्षात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपला मुकावं लागू शकतं.
पंत लवकरात लवकर बरा व्हावा आणि पुन्हा मैदानात खेळताना दिसावा, यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला रविवारी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामनाही जिंकून श्रीलंकेला क्लिन स्वीप देण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.