Retirement : रोहितच्या निवृत्तीची चर्चा असताना या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला अलविदा
Retirement : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या निवृत्तीची चर्चा असताना आर अश्विन याच्यानंतर एका भारतीय खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.
टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका 10 वर्षांनंतर गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने सिडनीत पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने विजय मिळवला. या मालिकेदरम्यान विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दोघेही टी 20i नंतर आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र या दरम्यान टीम इंडियाच्या एका तिसऱ्याच खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटरने सोशल मीडियावरुन पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर आणि हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषी धवन याने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऋषीने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. मी मर्यादित क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं ऋषीने जाहीर केलं. त्यामुळे ऋषी विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये खेळताना दिलणार नाही. मात्र ऋषी फर्स्ट क्लास अर्थात रणजी ट्रॉफीत खेळणार आहे.
हिमाचल प्रदेशने 5 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशवर 8 विकेट्सने विजय मिळवला. ऋषीने या विजयानंतर निवृत्तीची घोषणा केली. धवनने आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. तसेच 45 धावांची खेळी करत निर्णायक भूमिक बजावली. ऋषीच्याच नेतृत्वात हिमाचल प्रदेशने 3 वर्षांपूर्वी विजय हजारे ट्रॉफी उंचावली होती.
सर्वांचे आभार
ऋषीने निवृत्तीच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बीसीसीआय एचपीसीए, सहकारी आणि क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. तसचे पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे आभार मानले. धवनने आयपीएलमध्ये अखेरीस पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र यंदा ऋषीला कुणीच घेतलं नाही.
ऋषी धवनची कारकीर्द
दरम्यान ऋषी धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही औटघटकेची ठरली. ऋषीला एकूण 4 सामन्यांमध्येच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ऋषीने 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 धावा केल्या तर 1 विकेट मिळवली. तसेच एकमेव टी 20i सामन्यात 1 धाव आणि 1 विकेट मिळवली. तसेच ऋषीने आयपीएलमधील 39 सामन्यांमध्ये 210 करण्यासह 25 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.