नव्या खेळाडूंमुळे टीम इंडियाने गमावला सामना? रोहित शर्माचं आश्चर्यकारक विधान
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असं असताना रोहित शर्माने आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्याने या पराभवाचं खापर थेट नवख्या खेळाडूंवर फोडलं आहे. नेमकं काय बोलला ते जाणून घेऊयात
ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव केला. खरं तर नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात झुंजार खेळी केली नसती तर कदाचित पाचवा दिवसही पाहता आला नसता. पहिल्या आणि दुसऱ्या डावात दिग्गज खेळाडू निष्फळ ठरले. खासकरून कर्णधार रोहित शर्माची खेळी निराशाजनक होती. मधल्या फळीत असो की सलामीला दोन्ही ठिकाणी रोहित शर्मा फेल गेला आहे. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. असं असताना मेलबर्न कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्याच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहित शर्माने मेलबर्न कसोटी पराभवाचं विश्लेषण करताना सांगितलं की, हा सामना ड्रॉ करता आला असता. पण युवा खेळाडूंनी तग धरून खेळणं आवश्यक होतं. रोहित शर्माने या वक्तव्यातून पराभवाचं खापर युवा खेळाडूंवर फोडलं आहे. रोहित शर्मा पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलला ते जाणून घेऊयात
रोहित शर्माने सांगितलं की, ‘सामना गमवतो तेव्हा दु:ख होतं. फलंदाजाचा परफॉर्मेन्स असो की नसो. आमच्याकडे संधी होती आणि सामना जिंकू शकलो असतो. आम्ही हा सामना ड्रॉ सुद्धा करू शकलो असतो. आम्ही प्रयत्न केला. ज्यांनी धावा केल्या ते आणखी तग धरून खेळू शकले असते. पण ते नवखे खेळाडू आहेत ते यातून शिकतील.’ यानंतर रोहित शर्माने पराभवाबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ‘पराभव होणं हे निराशाजनक आहे. आम्ही शेवटपर्यंत लढू इच्छित होतो, पण तसं झालं नाही. फक्त शेवटच्या सत्रात नाही तर संपूर्ण सामन्यात कुठे चूक झाली हे पाहणं आवश्यक आहे. पूर्ण कसोटी सामन्यात आमच्याकडे संधी होती. आम्ही ऑस्ट्रेलियाला संधी दिली. एक वेळ ऑस्ट्रेलियाचे 90 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या.’
रोहित शर्माचा रोख हा यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांच्याकडे होता असं दिसत आहे. दोन्ही खेळाडू मैदानात तग धरून होते. पण टी ब्रेकनंतर पंतने चुकीचा फटका मारत बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वालला वादग्रस्त निर्णय देत बाद घोषित केलं. दुसरीकडे, रोहित शर्मा जर या खेळाडूंना दोष देत असेल तर स्वत:ही खेळत नाही हे तितकंच खरं आहे. तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावात एकूण 31 धावा केल्या आहेत. त्याचा बॅटिंग एव्हरेज हा 6.20 इतका आहे.
बातमी वाचा : 9, 0, 5…! भारताच्या दिग्गज खेळाडूंची महत्वाच्या सामन्यात खेळी, रोहित-विराटच्या खेळीमुळे क्रीडाप्रेमींचा संताप
बातमी वाचा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित बिघडलं, आता असं आहे समीकरण