IND vs BAN : पुण्यात रचला जाणार इतिहास? हिटमॅनच्या रडारवर धोनी आणि कपिल देव, जाणून घ्या!
ind VS ban world cup 2023 : भारताचा वर्ल्ड कपमधील चौथा सामना बांगलादेश संघासोबत होणार आहे. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माच्या रडारवर दोन्ही वर्ल्ड कप विजेत्या संघांच्या कर्णधारांचे रेकॉर्ड आहेत. नेमका कोणता रेकॉर्ड आहे तो जाणून घ्या.
पुणे : वर्ल्ड कप 2023 मधील भारताचा चौथा सामना भारत-बांगलादेश यांच्यात पार पडला जाणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र असोसिएशन स्टेडियममध्ये या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. कॅप्टनची गाडी वर्ल्ड कपमध्ये आतापर्यं सुसाट असल्याचं पाहायला मिळालं आहे. पहिला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना सोडला तर रोहितने दोन्ही संघांविरूद्ध तुटून पडलेला दिसला आहे. आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून रोहितच्या रडावर वर्ल्ड कप विजेते माजी कर्णधार कपिल देव आणि महेंद्र सिंह धोनी यांचा रेकॉर्ड आहे.
कोणता आहे तो रेकॉर्ड
वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत सर्वाधिक 217 धावा केल्या असून यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. रोहित पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता, त्यानंतरच्या दोन सामन्यात त्याने ही कामगिरी केलीये. कर्णधार म्हणून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये रोहित पाचव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात रोहितने 25 धावा केल्या तर हिटमॅन धोनीचा विक्रम मोडणार आहे. धोनीने वर्ल्ड कप 2011 मध्ये 241 धावा केल्य होत्या तर 2015 वर्ल्ड कपमध्ये 237 धावा त्याने केल्या होत्या.
पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी 1983 वर्ल्ड कपमध्ये 303 धावा केल्या होत्या. रोहितला हा विक्रम मोडण्यासाठी आजच्या सामन्यात 87 धावांची गरज आहे. त्यामुळे रोहितच्या बॅटमधून आणखी एक शतक आलं तर रोहित पुण्यात इतिहास रचणार आहे. एक झटक्यात दोन्ही दिग्गज कर्णधारांचे रेकॉर्ड मोडणार आहे. तसं पाहायला गेलं तर वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणूव सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर असून त्याने 2003 साली तीन शतकांच्या मदतीने 465 धावा केलेल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली असून त्याने 2019 साली 443 धावा केल्या होत्या.
दरम्यान, भारत आता पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड आठ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताने सलग तीन सामने जिंकले असून आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी रोहितसेना सज्ज असणार आहे. तर दुसरीकडे वर्ल्ड कपमध्ये तिसरा उलटफेर करण्यासाठी बांगलादेशचा संघ प्रयत्न करताना दिसेल.