इंझमाम उल हकच्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपानंतर रोहित शर्मा चवताळला, रिव्हर्स स्विंगचं अख्खं गणित मांडलं
टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एकही सामना न गमावता एन्ट्री मारली आहे. आता टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारतावर केलेल्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. बॉल टॅम्परिंगच्या आरोपानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इंझमाम उल हकवर भडकला आहे.
टी20 वर्ल्डकप 2024 जेतेपदापासून टीम इंडिया दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत भारताला सर्वप्रथम इंग्लंडचा सामना करायचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया अंतिम फेरी गाठेल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेलं. यावेळी पत्रकारांनी इंझमाम उल हकने केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधलं. इंझमामने टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात त्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलिम मलिक यानेही त्याच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. अर्शदीप सिंगचा चेंडू रिव्हर्स स्विंग होत असल्याने पंचांनी त्याकडे लक्ष ठेवलं पाहीजे. बॉल टॅम्परिंग केल्याशिवाय असं शक्य नसल्याचं त्याने सांगितलं होतं. इंझमामच्या या वक्तव्याचा कर्णधार रोहित शर्माने खरपूस समाचार घेतला आहे.
“वेस्ट इंडिजमध्ये फार उष्णता आहे. तसेच खेळपट्ट्याही कोरड्या आहेत. मग अशा स्थितीत चेंडू रिव्हर्स स्विंग होणार नाही तर कुठे होणार? आम्ही इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेत खेळत नाहीत.चेंडू स्विंग होतो कारण त्याला वेस्ट इंडिजमधील परिस्थिती कारणीभूत आहे. ही परिस्थिती प्रत्येक संघाल तशीच आहे”, असं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. इंझमाम उल हकने अर्शदीप सिंगचा रिव्हर्स स्विंग पाहिला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 15व्या षटकात असं झालं होतं. त्यानंतर अर्शदीपने 3 गडी बाद केले आणि टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीबाबतही कर्णधार रोहित शर्माने मन मोकळं केलं. “टीम इंडिया कायम दबावात असते आणि प्रत्येक खेळाडूला याची सवय आहे. संघाला शांत आणि संयम ठेवणं गरजेचं आहे. शांत राहणंच चांगलं आहे.” असं रोहित शर्माने सांगितलं. यावेळी रोहित शर्माला गयानाच्या खेळपट्टीवर चार फिरकीपटूंना संधी देणार का? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, खेळपट्टी पाहून याबाबत निर्णय घेऊ.
दोन्ही संघातील खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज , यशस्वी जयस्वाल.
इंग्लंड संघ: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले.