यशस्वी जयस्वालच्या बॅटला चेंडूला लागला होता की नाही? रोहित शर्मा म्हणाला..
चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद सुरु आहे. बाद होता की नाही यावरून चर्चांचे फड रंगले आहे. भारतीय क्रीडाप्रेमींना सोशल मीडियावर रान उठवलं आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने आपलं मत मांडलं आहे.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालची विकेट सर्वात वादग्रस्त ठरली. त्याच्या विकेटवरून बराच गोंधळ झाला. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाल यालाही विश्वास बसला नाही. खरं तर मैदानावरील पंचांनी यशस्वी नाबाद असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यूत सर्व अँगल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पाहिलं. पण कुठेच बाद असल्याचं स्पष्ट नव्हतं. तरी तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडलं आणि बाद असल्याचं घोषित केलं. या निर्णयानंतर गावस्कर, मांजरेकर यासारख्या दिग्गज खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर पॉन्टिंग आणि कॅटीच या ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी समर्थन केलं. त्यामुळे हा वाद सोशल मीडियावर चांगलाच तापला आहे. यावर आता कर्णधार रोहित शर्मा याने मत नोंदवलं आहे.
रोहित शर्माने यशस्वी जयस्वालच्या विकेटबाबत सांगितलं की, ‘तंत्रज्ञानात तसं पाहिलं तर काही दिसलं नाही. पण नुसत्या डोळ्यांनी पाहिलं तर असं वाटलं की बॅटला काही लागलं आहे. मला माहिती नाही की, पंच काय विचार करत होते. चेंडू टच झालेला की नाही. आता आम्ही त्या प्रकरणात खोलात जाऊ इच्छित नाही.’ मेलबर्न कसोटीत यशस्वी जयस्वालची विकेट 71 व्या षटकात पडली होती. तेव्हा यशस्वीने 208 चेंडूत 84 धावा केल्या होत्या. तेव्हा पॅट कमिन्सने लेग साईडला शॉर्ट बॉल टाकला आणि मोठा शॉट खेळण्याचा नादात फसला. हा चेंडू थेट विकेटकीपरच्या हाती गेला.
दुसरीकडे रोहित शर्माने शुबमन गिलबाबत सांगितलं की, ‘शुबमन गिलला प्लेइंग 11 मधून ड्रॉप केलं नव्हतं. आम्हाला फक्त एक चांगलं कॉम्बिनेशन हवं होतं. आम्हाली बॉलिंग आणि फलंदाजीत खोली हवी होती. बॉलिंग युनिटमध्ये आम्ही 20 विकेटचा विचार केला. त्यामुळे त्याची फलंदाजी चांगली नव्हती डावललं हा काही विषय नाही. फक्त आम्हाला तसं कॉम्बिनेशन हवं होतं.’, असं रोहित शर्मा म्हणाला.