टी20 वर्ल्डकप फायनलमधील ‘त्या’ क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना…
टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकू आता 16 दिवसांचा कालवधी लोटला तरी त्या मागच्या गोष्टी काही संपता संपत नाहीत. रोज टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील मनोरंजक गोष्टी समोर येत आहेत.आता रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना मनात काय सुरु होतं ते सांगितलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात रंगला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. पण एक स्थिती अशी होती की, दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे हा सामना पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे अशा स्थितीत डोकं शांत ठेवून योजना आखणं मोठी जबाबदारी होती. रोहित शर्मानेही जबाबदारी योग्य पद्धतीने बजावली. तसेच दक्षिण अफ्रिकेला फक्त 22 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने हा सामना 7 धावांनी जिंकला. पण हेन्रिक क्लासेनची फटकेबाजी पाहता हा गमवणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीची धुलाई केली. तसेच 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे शेवटच्या पाच षटकात रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं? याबाबत त्याने स्वत:च खुलासा केला आहे.
‘हो..मी पूर्णपणे ब्लँक होतो. मी फार पुढचा विचार केला नव्हता. माझ्यासाठी त्या क्षणात कामावर लक्ष केंद्रीत करणं खूप महत्त्वाचं होतं. सर्वांना शांत ठेवून अंमलबजावणी करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. जेव्हा दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा आवश्यक होत्या तेव्हा आम्ही खूपच तणावात होतो. पण त्या पाच षटकात आम्ही शांत असल्याचं दाखवून दिलं. आम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रीत केलं. या व्यतिरिक्त आम्ही फार कसला विचार केला नव्हता. आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे आमची बाजू भक्कम झाली.’, असं रोहित शर्माने सांगितलं.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत सामना खेचून आणू शकतो हे दाखवलं. बुमराहने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात 6 धावा दिल्या आणि मार्को जानसेनची विकेट घेतली. तर अर्शदीपने फक्त 4 धावा देऊन सामन्याची रंगत वाढवली. हार्दिक पांड्याने 17व्या षटकात क्लासेनची महत्वपूर्ण विकेट घेतली. तर शेवटच्या षटकात डेविड वॉर्नरची पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सामना भारताच्या पारड्यात पाडला. सूर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल घेतला. या विजयानंतर टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला.