वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत रोहित शर्माला प्रश्न विचारताच म्हणाला; आता विचार करणं…

| Updated on: Oct 26, 2024 | 7:26 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा निकाल लागला आहे. भारताने तीन सामन्यांची कसोटी मालिका दुसऱ्या सामन्यातच गमावली आहे. न्यूझीलंडने सलग दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित लांबलं आहे. असं असताना रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत रोहित शर्माला प्रश्न विचारताच म्हणाला; आता विचार करणं...
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताची धडपड सुरु आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सलग दोन सामने गमवून त्याला काही अंशी खिळ बसली आहे. भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार की नाही याबाबत आता शंका आहे. कारण भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीतील एकूण 6 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 4 सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. अन्यथा इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. खासकरून श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भारताच्या शर्यतीत अडसर ठरू शकतात. दुसरीकडे, न्यूझीलंडलाही अंतिम फेरीची तितकीच संधी आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांवर भारताचं जर तरच गणित अवलंबून असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताने मालिका गमावली असली तरी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. पण भारताची एकंदरीत कामगिरी पाहता क्रीडाप्रेमींना विजयाबाबत शंका आहे. असं असताना पत्रकारांनी कर्णधार रोहित शर्मावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत विचारलं. तेव्हा रोहित शर्माने टाळलं पण उत्तर देऊन गेला.

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत आता विचार करणं खूपच लवकर होईल. सध्या आम्ही मालिका गमावल्याने दुखावलो आहोत. आम्ही मालिकेत खूपच वाईट पद्धतीने खेळलो. हा आमचा सामूहिक पराभव आहे.” , असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं. इतकंच काय रोहित शर्माने फलंदाजांच्या शॉट सिलेक्शनवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. “आम्ही स्वीपिंग आणि रिव्हर्स स्वीपिंगबद्दल बोलत आहोत, पण अखेरीस जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजी करतो तेव्हा तो काय विचार करतो यावर अवलंबून असतो. तो निर्णय घेणे फलंदाजावर अवलंबून असते”., असं रोहित शर्माने सांगितलं.

भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमवला असला तरी अव्वल स्थानी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काही प्वॉइंटचा फरक आहे. तिसऱ्या सामन्यात पराभव झाल्यास भारताच्या विजयी टक्केवारीवर जबर परिणाम होणार आहे. इतकंच काय तर अंतिम फेरीत पोहोचणं कठीण होईल हे मात्र तितकंच खरं असेल.