भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांच्या संघांची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. मात्र कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 ने पराभवाचं तोंड पाहायला लागल्यानंतर पत्रकारांना याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा रोहित शर्माने सांगितलं की, मलाही माहिती नाही. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकू शकतो. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराह संघाचं कर्णधारपद भुषवू शकतो. असं असताना आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. रोहित शर्मा एकापेक्षा अधिक सामन्यात खेळणार नसेल तर त्याने पूर्ण मालिकेत कर्णधारपद भुषवू नये. त्याने एक खेळाडू म्हणून दौरा करावा. सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कर्णधाराने पहिला सामना खेळणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.
सुनील गावस्कर यांनी स्पोर्ट तकशी बोलताना सांगितलं की, ‘बघा, कर्णधाराला पहिला सामना खेळणं महत्त्वाचं असतं. जर तो जखमी असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण पहिल्याच सामन्यात लीडर अनुपस्थिती असेल तर उपकर्णधारावर दबाव वाढतो. ते प्रेशर वेगळ असतं. त्यानंतर कर्णधारपदाची पुन्हा जबाबदारी स्वीकारणं कठीण होऊन बसतं.’
‘मला पण माहिती नाही, पण जे काही कळतं ते वाचून कळतं. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. कदाचित दुसऱ्या सामन्यातही खेळणार नाही. जर असं असेल तर निवड समितीने याबाबत आताच स्पष्ट काय ते बोललं पाहीजे. अजित आगरकरने सांगितलं पाहीजे की, जर तुला आराम करायचा असेल तर आराम कर. जो काही तुझं वैयक्तिक कारण असेल.’, असंही सुनील गावस्कर म्हणाले.
‘पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2 ते 3 सामने खेळत नाही. तर दौऱ्यावर एक खेळाडू म्हणून जा. दुसऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये जेव्हा पाहीजे तेव्हा जा. या दौऱ्यासाठी कर्णधार बदलून उपकर्णधाराकडे जबाबदारी सोपणार असाल तर त्यात स्पष्टता असावी. कर्णधाराची एक जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही 3-0 ने हरता तेव्हा नेतृत्व आवश्यक आहे. नक्कीच आवश्यक आहे.’ , असंही त्यांनी पुढे सांगितलं.