कसोटी मालिकेनंतर रोहित शर्मा-विराट कोहली जाणार सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफीत होणार दर्शन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तयारीसाठी टीम इंडियाकडे ही शेवटची संधी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर उर्वरित तीन सामन्यात हवी तशी कामगिरी झाली नाही. दोन सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे या दोघांनी संघातून बाद करण्याची मागणी जोर धरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचा फॉर्म काही दिसत नाही. अशा स्थितीत एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन्ही स्टार खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर सुट्टीवर जाणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. दोन स्टार फलंदाजांसोबत जसप्रीत बुमराहही ब्रेक घेणार आहे. एका मिडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे, इंग्लंड विरुद्ध फेब्रुवारी महिन्यात वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाहीत.
मीडिया रिपोर्टनुसार, वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने तिघंही या मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. यानंतर थेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी उतरतील. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघही जाहीर केला आहे. पाच टी20 सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरु होईल. त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टी20 मालिकेत त्यांचा प्रश्नच येत नाही. पण वनडे मालिकेत खेळणार नसल्याच्या बातमी क्रीडाप्रेमी नाराज आहेत. दुसरीकडे, रोहित आणि विराटने मालिकेत खेळायचं की नाही याचा निर्णय निवड समिती घेणार आहे. पण सध्या तरी हे दोघं मालिका खेळणार नाहीत अशी माहिती मिळत आहे.
जसप्रीत बुमराह हे भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याला आराम मिळणं गरजेचं आहे असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. बुमराहचा चांगला फॉर्म पाहता त्याला आराम देणं योग्यच असल्याचं क्रीडाप्रेमींच म्हणणं आहे. कारण बुमराह गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सक्रीय आहे. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीत फ्रेश ठेवणं आवश्यक आहे. दुसरीकडे, विराट आणि रोहितचा फॉर्म पाहता त्यांनी आराम करणं क्रीडाप्रेमींना काही रुचलेलं नाही. खरं तर त्यांच्यासाठी फॉर्ममध्ये परतण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरू शकते.