रोहित शर्माच भारताचा नवा कसोटी कर्णधार होणार! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा पुढच्या आठवड्यात
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे. पण, आता कसोटी संघाची कमानही त्याच्या हातात असेल. म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो भारताचा कर्णधार असेल, अशी माहिती नुकतीच मिळाली आहे.
मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे. पण, आता कसोटी संघाची कमानही त्याच्या हातात असेल. म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो भारताचा कर्णधार असेल. Insidesport नुसार, पुढील आठवड्यात कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्याच वेळी, टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी (Team India for Sri Lanka Series) देखील निवड केली जाईल. जेव्हा भारतीय निवडकर्ते श्रीलंकेसाठी संघ निवडण्यासाठी बसतील तेव्हा ते रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती जाहीर करतील, असे वृत्त आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) राजीनाम्यापासून टीम इंडियातील कसोटी कर्णधारपद रिक्त आहे. सध्या कसोटी मालिका नव्हती, त्यामुळे निवडकर्त्यांनी त्यावर लगेच कोणताही निर्णय घेतला नाही. पण, आता भारताला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 2 कसोटी सामने खेळायचे असल्याने कर्णधाराची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर, रोहित शर्माशिवाय, केएल राहुल, ऋषभ पंत यांची नावंदेखील कसोटी कर्णधारपदासाठीच्या दावेदारांमध्ये चर्चेत आली आहेत. पण, दक्षिण आफ्रिकेत केएल राहुलच्या अपयशानंतर रोहित शर्मा निवडकर्त्यांची, प्रशिक्षकांची पहिली पसंती म्हणून पुढे आला.
रोहित शर्माच्या नावाची घोषणा पुढील आठवड्यात : BCCI सूत्र
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी Insidesports ला सांगितले की, “निवडक, खेळाडू, प्रशिक्षक, प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे. ते म्हणजे रोहित शर्मा. त्याच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात श्रीलंकेसोबतच्या मालिकेसाठी संघ निवड झाल्यानंतर केली जाईल.
IND Vs SL मालिकेचे वेळापत्रक
- 24 फेब्रुवारी – पहिला T20 सामना, लखनौ
- 26 फेब्रुवारी – दुसरा T20 सामना, धर्मशाळा
- 27 फेब्रुवारी – तिसरा T20 सामना, धर्मशाळा
- 4-8 मार्च – पहिली कसोटी, मोहाली
- मार्च 12-16 – दुसरी कसोटी, बेंगळुरू (डे-नाईट)
या मालिकेत भारत आणि श्रीलंकेचे संघ डे-नाईट कसोटीही खेळणार आहेत. ही कसोटी 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. अहमदाबादमध्ये ही कसोटी खेळली गेली आणि दोन दिवसांत सामना संपला. टीम इंडियाने पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट खेळली आणि जिंकली, तर ऑस्ट्रेलियात पराभव झाला.
इतर बातम्या
IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, विराट कोहली मोहालीत खेळणार 100वी कसोटी