मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील मालिकेला 10 तारखेपासून सुरूवात होणार आहे. तीन टी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून, एकदिवसीय मालिका 17 डिसेंबरपासून आणि कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारताने 31 वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने कसोटी मालिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
भारताने आफ्रिकेमध्ये 1991 नंतर आठ दौरे केले आहेत त्यामधील फक्त 2010-11 मध्ये झालेली मालिका बरोबरीत सुटली होती. भारतीय संघासाठी यंदा हा डाग पुसण्याची एक चांगली संधी चालून आली आहे. रोहित अँड कंपनीने ही कामगिरी केली तर मोठा इतिहास रचला जाणार आहे. कारण 1991 नंतर भारताच्या कर्णधारपदी अनेक खेळाडू येऊन गेले. मात्र कोणालाच आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकता आली नाही.
मला वाटतं भारतीय संघासाठी ही मालिक म्हणजे मोठी संधी आहे. भारताला ही कसोटी मालिका जिंकताना पाहायचं आहे. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील मालिका जिंकली तर वर्ल्ड कप जिंकल्यासारखं आहे, असं एस श्रीसंत याने म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वन डे आणि टी-20 मालिकेमध्ये विश्रांती दिली आहे. वन डे मध्ये के.एल. राहुल तर टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव आणि कसोटीमध्ये रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी. , जसप्रीत बुमराह (VC), प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद, सिराज, मुकेश कुमार.