SA vs IND : हार्दिक पंड्याने लाज राखली, दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?
South Africa vs India 2nd T20i : हार्दिक पंड्या याने अखेरीस अर्शदीप सिंह याच्यासह निर्णायक भागीदारी केल्याने टीम इंडियाला 120 पार मजल मारता आली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात 200 पार मजल मारणाऱ्या टीम इंडियाची दुसर्या सामन्यात दुर्दशा झाली. मात्र हार्दिक पंड्या याने अर्शदीप सिंह याच्यासह डाव सावरला. त्यामुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या याने सर्वाधिक आणि नाबाद 39 धावा केल्या. अक्षर पटेल याने 27 तर तिलक वर्माने 20 धावांचं योगदान दिलं. मात्र टीम इंडियाचे पहिले 3 फलंदाज अपयशी ठरल्याने आश्वासक सुरुवात मिळू शकली नाही. परिणामी दक्षिण आफ्रिका भारताला 125 आधी रोखण्यात यशस्वी ठरली. आता टीम इंडियाचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टॉप ऑर्डर ढेर
संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात शतक ठोकलं.संजूचे हे सलग आणि एकूण दुसरं टी 20i शतक ठरलं. मात्र संजू या दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. संजूला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव हे दोघेही प्रत्येकी 4 धावा करुन माघारी परतले. त्यानंतर तिलक वर्मा 20 धावा करुन बाद झाला. अक्षर पटेल दुर्देवी ठरला. अक्षर 27वर रन आऊट झाला. तर फिनिशर रिंकु सिंह यालाही त्याचा जलवा दाखवता आला नाही. रिंकु 9 धावांवर बाद झाला.
हार्दिक आणि अर्शदीपची निर्णायक भागीदारी
त्यानंतर हार्दिक आणि अर्शदीप या दोघांनी सातव्या विकेटसाठी 37 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला 124 पर्यंत पोहचवलं. हार्दिकने 45 बॉलमध्ये 4 फोरसह नॉट आऊट 39 रन्स केल्या. तर अर्शदीपने 6 बॉलमध्ये 1 सिक्ससह नॉट आऊट 7 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून 6 जणांनी बॉलिंग टाकली. त्यापैकी 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि आवेश खान.