SA vs IND 3rd T20i : टीम इंडियाचा रंगतदार सामन्यात विजय, दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी मात
: South Africa vs India 3rd T20I Match Result : अर्शदीप सिंह याने 20 व्या ओव्हरमध्ये मार्को यान्सेन याली एलबीडबल्यू आऊट करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
मार्को यान्सेन याने केलेल्या विस्फोटक अर्धशतकी खेळीमुळे शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं होतं. मार्को यान्सेन याने जीव ओतून सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला. मात्र निर्णायक क्षणी आऊट झाल्याने भारताचा विजय निश्चित झाला. दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देत विजयी आव्हानांपासून रोखण्याचा वारंवार प्रयत्न केला. या प्रयत्नात भारताला यशही आलं. मात्र अखेरच्या क्षणी मार्को यान्सेन याने राक्षसी खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज होती. त्यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली होती.
भारताकडून अर्शदीप सिंह शेवटची ओव्हर टाकायला आला. दक्षिण आफ्रिकेकडून यान्सेनसह गेराल्ड कोएत्झी होता. कोएत्झीने पहिल्या बॉलवर एक धाव घेत यान्सेनला स्ट्राईक दिली. यान्सेनने दुसऱ्या बॉलवर सिक्स खेचला. यान्सेनने यासह 16 चेंडूत अर्धशतक केलं. मार्को दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकनंतर वेगवान अर्धशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. आता दक्षिण आफ्रिकेला 4 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती. अर्शदीपने अचूक बॉल टाकला आणि यान्सेनला फसवलं. यान्सेन एलबीडबल्यू आऊट झाला. यान्सेनने 17 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोरसह 54 धावा केल्या. यान्सेनच्या रुपात दक्षिण आफ्रिकेने सातवी विकेट गमावली. भारताचा या विकेटसह विजय निश्चित झाला मात्र औपचारिकता बाकी होती. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 3 चेंडूत 18 धावा हव्या होत्या. मात्र त्यांना अर्शदीपने 7 धावाच करुन दिल्या आणि भारताने सामना 11 धावांनी जिंकला.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजाना अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. ओपन रायन रिकेल्टन 20, रिझा हेंड्रीक्स 21, ट्रिस्टन स्टब्स 12, कॅप्टन एडन मारक्रम 29, डेव्हिड मिलर 18 आणि हेन्रिक क्लासेन याने 41 धावा केल्या. मात्र त्यांची ही खेळी दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात उपयोगी ठरली नाही. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थी याने दोघांना बाद केलं. तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
भारताची बॅटिंग
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. संजू सॅमसन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्यांनतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. अभिषेकने 24 चेंडुत दुसरं अर्धशतक झळकावलं. मात्र 25 व्या बॉलवर स्टंपिग झाला आणि भारताला दुसरा झटका लागला. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव 1 आणि हार्दिक पंड्या 18 धावांवर माघारी परतले. रिंकु सिंह यानेही निराशा केली आणि 8 रन्स करुन बाद झाला. मात्र या दरम्यान तिलक वर्मा दुसरी बाजूला धरुन होता.
रिंकूनंतर डेब्यूटंट रमनदीप सिंह याने पहिल्याच बॉलवर सिक्स खेचत तो काय आहे, हे दाखवून दिलं. मात्र त्याला अखेरपर्यंत टिकून राहून नाबाद परतता आलं नाही. रमणदीप 15 वर रनआऊट झाला. तर तिलक वर्माने पहिलंवहिलं शतक झळकावलं. तिलकने नाबाद 107 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल 1 रनवर नॉट आऊट राहिला. भारताने अशाप्रकारे 6 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. तर यजमान दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले सिमेलेन आणि केशव महाराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को यान्सेन याने 1 विकेट घेतली.
भारताची विजयी आघाडी
#TeamIndia emerge victorious in a high-scoring thriller in Centurion 🙌
They take a 2⃣-1⃣ lead in the series with one final T20I remaining in the series 👏👏
Scorecard – https://t.co/JBwOUChxmG#SAvIND pic.twitter.com/StmJiqhI7q
— BCCI (@BCCI) November 13, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.