SA vs IND : पाखरांनी सामना थांबवला, खेळाडूंवर मैदान सोडण्याची वेळ, नक्की काय झालं? पाहा व्हीडिओ
South Africa vs India 3rd T20i : पाखरांमुळे सामना थांबवण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंना मैदान सोडावं लागलं. व्हीडिओत पाहा काय काय झालं?
अनेकदा पावसामुळे किंवा खराब प्रकाशामुळे क्रिकेट सामन्यात व्यत्यय येतो. मात्र दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सेंच्युरियन येथे खेळवण्यात येत असलेला तिसरा टी 20i सामना भलत्याच कारणामुळे थांबवावा लागला. सामन्यातील दुसऱ्या डावात पाखरांमुळे आणि प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. या पाखरांनी मैदानात आक्रमण केलं. या पाखरांमुळे खेळात अडथळा निर्माण झाल्याने पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. या पाखरांनी सारं मैदान पाहतापाहता कसं व्यापलं? याचे फोटो आणि व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टीम इंडियाने तिलक वर्मा याचं नाबाद शतक आणि अभिषेक शर्मा याच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 220 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकेल्टन आणि रीझा हेंड्रिक्स ही सलामी जोडी मैदानात आली. या जोडीने पहिल्या षटकात बिनबाद 7 धावा केल्या. मात्र त्यानंतर पाखरांमुळे आणि प्रकाशामुळे पंचांनी काही वेळ खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की काय झालं?
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात होताच या पाखरांनी मैदानात सर्वत्रच हातपाय पसरले. ही पाखरं मोठ्या प्रमाणात लाईटभोवती भिरभरत होती. पाखरं फलंदाजाच्या हेल्मेटमध्येही गेली. पाखरांमुळे खेळाडूंना त्रास वाढू लागला. त्यामुळे पंचांनी 10 वाजून 44 मिनिटांच्या आसपास खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू है मैदानाबाहेर गेले.
ग्राउंड स्टाफची ‘कसोटी’
पावसामुळे सामना थांबल्यास ग्राउंड्स स्टाफची कसोटी लागते. पाण्याचा निचरा करण्यापासून ते खेळपट्टी खेळण्यासारखी करण्याचं आव्हान, हे त्यांच्यासमोर असतं. मात्र या पाखरांचा निकाल लावण्याचं आव्हान ग्राउंड स्टाफसमोर होतं आणि ते आव्हान त्यांनी सार्थपणे पार पाडलं. पंचांनी त्यानंतर मैदानाची पाहणी केली. त्यानंतर बीसीसीआयने रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार असल्याची माहिती एक्स या सोशल हँडलवरुन दिली आहे.
पाखरांचा हल्ला आणि खेळ थांबला
First time I’ve seen play stopped because of flying ants #INDvSA #Cricket pic.twitter.com/XFFN2KgVwm
— The Drunken Copywriter (@G_S_Meredith) November 13, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.