सचिन तेंडुलकरने दिला होता मदतीचा हात, त्याच्या मुलाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केली कमाल! भारताशी आहे खास नातं
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही. पण भारताला सहा पदकं जिंकण्यात यश आलं. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ज्याला मदत केली होती त्या व्यक्तीच्या मुलाने ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवली आहेत. त्यामुळे क्रीडाविश्वात त्याची चर्चा रंगली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता झाली असून भारताच्या पारड्यात फक्त सहा मेडल पडली आहेत. भारताकडून 117 स्पर्धकांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. पण भारताला एक रजत आणि पाच कांस्य पदकांवर समाधान मानावं लागलं. मेडल गुणतालिकेत भारत 71व्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक पदकं मिळवून अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. ही ऑलिम्पिक स्पर्धा बऱ्याच पैलूंनी स्मरणात राहणारी ठरली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ज्या व्यक्तीला मदत केली त्यांच्या मुलाने ऑलिम्पिकमध्ये कमाल केली. दोन पदकं जिंकण्यात यश मिळवलं. सचिन तेंडुलकरने मदत केलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन आहेत. विन्स्टोन यांचा पूत्र राय बेंजामिन याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदकं जिंकली. यात वैयक्तिक आणि सांघित असं दोन पदकं आहेत. रायने 400 मीटर हर्डल शर्यत आणि सांघिक स्पर्धेत 4×400 मीटर रिले रेस जिंकत एक विक्रम प्रस्थापित केला.
सचिन तेंडुलकरने मदत केलेले माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत. 1980 आणि 1990 दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. विन्सटनने 106 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून 161 विकेट घेतल्या आहेत. यात 85 वनडे सामन्यात 100 विकेट, तर 21 कसोटीत 61 विकेट्स घेतल्या आहेत. विन्स्टन बेंजामिन अँटिगामध्ये क्रिकेट प्रशिक्षण देण्याचं काम करतात. या कामासाठी त्यांनी 2022 मध्ये सचिन तेंडुलकरकडे मदतीचं आवाहन केलं होतं. ही मदत आर्थिक नसून सामानाच्या रुपाने होती. विन्स्टोन यांच्या आवाहानाप्रमाणे क्रिकेटशी निगडीत वस्तू सचिनने दिल्या होत्या. सचिनसह भारताचा माजी क्रिकेटपटू अझरुद्दीननेही बेंजामिन यांना मदत केली होती.
विन्स्टन बेंजामिन यांचं भारताशी खास नातं आहे. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात 1987 मध्ये भारतातून केली होती. त्यांनी पहिला सामना दिल्लीत खेळला होता. त्यांनी वनडेतील बेस्ट स्पेल भारतात टाकला होता. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात झाला आणि यात बेंजामिन यांनी 5 विकेट घेतल्या होत्या.