‘लय अवघड आहे गड्या उमगया बाप रं’, सचिन तेंडुलकरने शेअर केल्या वडिलांसोबतच्या आठवणी
आपल्या आयुष्यात आईचं महत्त्व शब्दांत मांडता येणार नाही, असंच असतं. पण वडिलांचं म्हत्त्वदेखील तितकच असतं. वडील वरुन कठोर दिसतात पण ते आतून खूप मऊ असतात. आता तर घरोघरी वडील हे मित्रासारखं मुलांशी वागतात. त्यामुळे मुलाचं आणि वडिलांचं एक वेगळ्या स्तरावरचं भावनिक घट्ट नातं असतं. क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर याचे वडील रमेश तेंडुलकर प्रसिद्ध साहित्यिक होते. सचिनने आपल्या वडिलांसोबतच्या गोड आठवणी मुलाखतीतून शेअर केल्या आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त दादरमध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयकडून मराठी संशोधन पत्रिका, नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात क्रिकेटचा देवता म्हणून ख्याती असलेला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. या मुलाखतीत सचिन तेंडुलकर याने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या वडिलांना वाचनाची किती आवड होती या विषयी सचिनने माहिती दिली.
“बाबांबद्दल बोलायचं तर तेव्हा मी फार लहान होतो. बाबांचं लहानपण अलिबागला गेलं. लहानपणी आव्हानं होती. ती त्यांनी पार पाडली. ते शाळेत जाताना 8-10 किलोमीटर चालत जायचे, त्यांच्यासोबत एक कुत्रा होता. ते त्याला सोबत घेऊन जायचे. वाचण्याची आणि शिकण्याची एक आवड बाबांना होती. अनेकांकडून मी ऐकलं होतं. काही गोष्टी आवडत नसताना कराव्या लागतात. बाबांना कायम आव्हानं आली. पण त्यांनी व्यक्त केली नाहीत. त्यांचे ते सोडवायचे. आमच्यापर्यंत ते काही पोहोचू देत नव्हते”, असं सचिन म्हणाला.
‘बाबा अगोदर CID मध्ये होते’
“मुंबईला बाबा आले तेव्हा सर्व कुटुंब इकडे आले होते. दादरला आम्ही राहिलो. आमच्या दोन रुम होत्या. तिथं एका कोपऱ्यात बाबा वाचत असत. बाबा अगोदर CID मध्ये होते. तिथं नोकरी केली. तिथं ते नोकरी करून शिकत होते. त्यांना घरात आवाज खूप व्हायचा. त्यातही त्यांनी अभ्यास केला. त्यांनी BA आणि MA मध्ये गोल्ड मेडल मिळवलं”, असं सचिनने सांगितलं.
‘गाडीत म्युझिक लावायचो तरी बाबा…’
“मी गाडी घेतली तेव्हा वांद्रेवरून वानखेडेला प्रॅक्टिसला जायचो तेव्हा बाबांना कीर्ती कॉलेजला सोडायचो. तेव्हा कायम बाबा पुस्तक वाचत बसायचे. तेव्हा मी म्युजिक लावून जायचो तरी ते पुस्तकं वाचत जायचे. बाजूला ट्रॅफिक, गाडीत गाणी, तरीही बाबा वाचत जायचे. यातून मोठा धडा त्यावेळी मिळाला होता”, अशी आठवण सचिनने सांगितली.
‘आई-बाबा मला कायम शिवाजी पार्कला भेटायला यायचे’
“मी वांद्रेनंतर शारदा श्रम जॉईन केली. बांद्रावरून कबूतर खाना पोहचायला वेळ लागायचा. त्यानंतर मी दादरला काका काकूंकडे राहिलो. चार वर्ष तिथं राहिलो. क्रिकेट जास्त आवडायला लागलं तेव्हापासून स्वप्न होतं की इंडियासाठी खेळायचं आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे. मी प्रॅक्टिस करून खूप थकायचो. घरी येऊन डायरेक्ट झोपायचो. पण आई-बाबा मला कायम शिवाजी पार्कला भेटायला यायचे”, अशीदेखील आठवण सचिनने सांगितली.
‘आचरेकर सरांना मी बोललो, सर घरी जेवायला या, तेव्हा…’
“बाबा असताना देखील आम्हाला कायम स्वतंत्र होतं. बाबा आहेत म्हणून कसली भीती नव्हती. आई-बाबा बसने मला भेटायला यायचे. गाडी ठेवतो बोललो तरीही ते बसने ते मला भेटायला यायचे. मी शाळेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आचरेकर सरांना मी बोललो, सर घरी जेवायला या. तेव्हा सर मला बोलले की जेव्हा तू शतक करशील तेव्हा मी तुझ्या घरी जेवायला येईन. पण तेव्हा मी ती रात्र जागा राहिलो. तेव्हा मीच नाही तर बाबा पण जागे होते. दुसऱ्या दिवशी मी MIG ला सामना खेळलो तेव्हा तिथं शतक केलं”, असं सचिन म्हणाला.
“आमचं चौथ्या मजल्यावर घर होतं. तेव्हा लिफ्ट नव्हती. तेव्हा घरात सोफ्यावर कोणी ना कोणी बसलेलं असायचं. त्यांना बाबा स्वतः पाणी द्यायचे. ती बसलेली माणसं ही पोस्टमन, वॉचमन, माळी असायचे”, असं सचिनने सांगितलं.
‘ते माझे पहिले शूज होते’
“बाबा प्रेमाने समजवून सांगायचे केव्हाही रागावून सांगायचे नाहीत. आमच्या घरात जास्त क्रिएटीव्ह नितीन आहे. यात कोणाला डाउट नाही. एक चित्र आमच्या घरात आहे, त्या चित्रातली माती ही शिवाजी पार्कची वापरली आहे. नितीन कामाला लागला होता तेव्हा त्याने शूज दिले होते. मी खूप हट्टाने ते शूज घेतले होते. ते माझे पहिले शूज होते”, अशी आठवण सचिनने दिली.
सचिनचा युवकांना काय सल्ला?
“माझ्या आजूबाजूला एवढे वरिष्ठ बसले आहेत त्यावरून वाटत नाही की मी सल्ला द्यावा. पण माझ्या बाबांनी दिलेला सल्ला तुम्हाला देईन. मला 100 टक्के घरातून पाठिंबा होता. घरात वातावरण निर्माण करणं महत्वाचं असतं. बाबांचा अनुभव मी घेतला आहे. ते केव्हाही चिडले नाहीत. ते मला चांगल्या मूडमध्ये कसं ठेवता येईल याचं ते बघायचे. मी पालकांना सांगू इच्छितो की पाल्याला काय आवडत आहे ते करुद्या. त्याची आवड तुम्ही समजून घ्या. पण मुलांनी पण लक्षात ठेवा की आपली जबाबदारी आपल्यावर आहे. तुमची जर्नी हृदयातून होऊद्या आणि जे करणार ते पूर्ण मन लावून करा”, असा सल्ला सचिनने दिला.