Mala Ankola : माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईच्या मृत्यूचं गूढ वाढलं, नक्की काय घडलं?
Former Cricketer Salil Ankola Mother: माजी भारतीय क्रिकेटर आणि अभिनेता सलील अंकोला यांच्या मातोश्री माला अंकोला या पुण्यातील घरात मृतावस्थेत सापडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा डेक्कन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
माजी भारतीय क्रिकेटर सलील अंकोला यांच्या आईचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फ्लॅटमध्ये गेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांना प्राथमिक तपासात सलील अंकोला यांच्या आईच्या मानेवर जखम असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांना कुणी संपवण्याचा प्रयत्न केला की त्यांनी स्वत:लाच संपवलं? की आणखी काही? याचा शोध घेतला जात आहे. तसेच ज्या घरात हा सर्व प्रकार घडला त्या घराला आतून कडी होती. त्यामुळे नक्की या मागे कुणाचा हात आहे का? याचा आता शोध सुरु आहे.
माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचं माला अशोक अंकोला असं होतं. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्या पुण्यातील प्रभात डेक्कन या भागातील ‘आदी’ या इमारतीत राहायच्या. घरकाम करणारी महिला घरी आली. तेव्हा घर बंद आढळलं. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीस शुक्रवारी संध्याकाळी माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. घर आतून बंद असल्याने नातेवाईकांकडून चावी घेतली आणि दरवाजा उघडण्यात आला. दार उघडल्यानंतर माला अंकोला या मृतावस्थेत सापडला. तसेच त्यांच्या गळ्यावर जखमही होती. पोलीस माला यांना रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
घरात कुणी घुसलेलं?
घरात कुणी घुसून माला अंकोला यांना संपवून निघून गेला का? तसेच कुणी ओळखीची व्यक्ती घरात आली होती का? तसेच घरात कुणी आधीपासूनच होतं आणि त्याने माला यांना संपवून पळ काढला का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र पोलिसांना अद्याप घरात कुणी आल्याचा/ आधीपासूनच असल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नाही.
आता माला अंकोला यांनी स्वत:चाच गळा कापून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला का? यात डेक्कन पोलिसांना फार दम वाटत नाही. त्यामुळे पोलिसांकडून तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. तसेच माला अंकोला यांनी कोणत्या त्रासातून टोकाचं पाऊल उचललं का? माला अंकोला यांना कशाचा त्रास होता का? याचाही शोध घेतला जात आहे.
आतापर्यंत अनेक पद्धतीने स्वत:ची जीवनयात्रा संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र हे प्रकरण थोडं वेगळं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण कोणतीही व्यक्ती स्वत:च्या गळ्यावर कसं काय वार करु शकते? जर असं नसेल तर या ती दुसरी व्यक्ती कोण? असा प्रश्नही उपस्थित होतो. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच घराशेजारील सीसीटीव्ही तपासण्यात येत असून चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणात लीड मिळण्यासाठी फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे. आता या घडीला प्रश्न अनेक आहेत मात्र उत्तरं नाहीत. या सर्व तपासानंतर आणि शवविच्छेदनाच्या अहवालातून काय समोर येतं? यातूनच सारा उलगडा होईल.