विराट कोहलीनंतर सॅम कोनस्टासही आयसीसीच्या रडारवर, या नियमाचा भंग केल्याने मिळणार शिक्षा?
भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमवून 311 धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यातच सॅम कोनस्टासने आपली छाप सोडली. त्याने 65 चेंडूत 60 धावांची खेळी केली. पण सामन्यात एक चूक करून बसला.
भारत ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. 6 गडी बाद 311 धावा केल्या असून दुसऱ्या दिवशी यात आणखी भर पडणार यात शंका नाही. पहिल्या दिवशी कसोटीत पदार्पण करणाऱ्या सॅम कोनस्टासने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकले. तसेच 65 चेंडूत 60 धावा केल्या. या सामन्यात सॅम कोनस्टासची विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत हमरीतुमरी झाली. पण पहिल्याच सामन्यात सक्षमपणे खेळणारा सॅम कोनस्टास हिरो ठरला आहे. असं असताना फॅन्सची एक मागणी पूर्ण करताना मोठी चूक करून बसला. त्याची खेळी पाहून क्रीडाप्रेमी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यास उत्सुक होते. सोशल मीडियावरील एका दावा करण्यात आला आहे की, असं करताना त्याने चूक केली. आयसीसीचा नियम मोडला असून त्याला त्याची शिक्षा मिळू शकते.
सॅम कॉनस्टास डगआऊटमध्ये बसला होता आणि तिथे त्याचा छोटा इंटरव्यू झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण एका चाहत्यांच्या विनंतीनंतर त्याने त्याचा फोन घेऊन सेल्फी घेतला. असं केल्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन आहे. आयसीसी अँटी करप्शन नियमानुसार, कोणताही खेळाडू सामन्यादरम्यान मॅच खेळणाऱ्या भागात मोबाईलसारख्या कोणत्याही डिव्हाईसचा वापर करू शकत नाही. इतकंच काय तर विना परवानगी सामना सुरु असलेला भाग सोडून जाणं प्रतिबंधित आहे. सामना सुरु असताना हा भाग सोडण्यासाठी अधिकृत परवानगी घेणं आवश्यक आहे. आयसीसीच्या या नियमांचं कुठे ना कुठे सॅम कॉनस्टासने उल्लंघन केलं आहे.
जर एखाद्या खेळाडूंनी या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. नियमानुसार, खेळाडूवर आर्थिक दंड लावला जाऊ शकतो. कारण या नियमांकडे कानाडोळा करत डग आऊट सोडत फॅन्समध्ये गेला. त्यानंतर फोनचा वापर केला. हा फोन फॅन्सचा होता. आता त्याने ही कृती परवानगी घेऊन केली की नाही? तसेच मॅच रेफरी काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागून आहे.