संजीव गोयंका यांनी महेंद्रसिंह धोनीसोबतही असंच केलं होतं! 2017 साली जे काही घडलं तेच केएल राहुलसोबत होणार?
आयपीएल 2024 स्पर्धेतील 57व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला. या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचं गणित विस्कटलं आहे. सामन्यानंतर याची प्रचिती संजीव गोयंका यांचा राग पाहून आली. संजीव गोयंका यांनी केएल राहुलला भर मैदानात खडे बोल सुनावल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची लढत रंगतदार वळणावर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी 16 गुणांसह आपलं स्थान प्लेऑफमध्ये पक्कं केलं आहे. मात्र त्याबाबत अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. उर्वरित दोन संघांसाठी आता जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स सोडलं तरी प्रत्येक संघाला काही ना काही संधी आहेच. असं असताना कोट्यवधी रुपये लावणाऱ्या संघ मालकांना वेगळंच टेन्शन आल्याचं दिसत आहे. फ्रेंचायसीच्या सुमार कामगिरीसाठी आता त्यांचा राग स्पष्टपणे मैदानात दिसू लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालक पार्थ जिंदल यांचा एक व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे संघ मालक आता मैदानात वागत असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या सामन्यानंतर याची प्रचिती पुन्हा एकदा आली. लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांच्या हावभावावरून बरेच काही अंदाज बांधले जात आहेत. सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा 10 विकेट्सने दारूण पराभव केल्यानंतर संजीव गोयल संतापल्याचं दिसून आलं आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याच्यावर संघ मालक संजीव गोयंका भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात संजीव गोयंका केएल राहुलसोबत रागारागाने बोलत असल्याचं हावभावावरून दिसत आहे. तर दुसरीकडे, केएल राहुल त्यांचं म्हणणं निमुटपणे ऐकत आहे. गोएंका यांच्या हावाभावानंतर क्रिकेट जाणकारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. “मालकांनी त्यांच्या टीमबद्दलच्या भावना बंद दाराआड करणं उचित ठरेल. असं उघडपणे व्यक्त होणं खेळावर परिणाम करणारं ठरू शकते.”, असं क्रिकेट जाणकारांनी सांगितलं आहे.
सामन्यातील पराभवानंतर अशा प्रकारे व्यक्त होणं चर्चांना बळ देणारं ठरत आहे. आता केएल राहुल या सर्व चर्चांना काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. केएल राहुल 2022 पासून लखनौचं नेतृत्व करत आहे. संजीव गोयंका यांनी 2022 मध्ये 7090 कोटी रुपये मोजून या फ्रेंचायसीचे हक्क घेतले आहेत. मागच्या दोन पर्वात संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र जेतेपद मिळवण्यात अपयशी ठरले. पण यंदा प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. दुसरीकडे, 2025 मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी केएल राहुलला रिलीज केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीलाही अशाच रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघाबाबतही असंच काहीसं झालं होतं. या संघाची मालकी संजीव गोयंका यांच्याकडे होती. तेव्हा त्यांनी कर्णधार एमएस धोनीला बाजूला सारून कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे सोपवलं होतं. त्यानंतर या निर्णयावर बरीच टीका झाली होती. पण तेव्हा गोयंका यांनी क्रिकेटनेक्स्टशी बोलताना सागितलं होतं की, ‘मीडियाला काहीही म्हणू दे. सोशल मीडियावरही काय व्हायचं ते होऊ दे. मी सगळ्यांचा आदर करतो. मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो. पण मला नाही वाटत की कॅप्टन बदलण्याचा विषय सार्वजनिक चर्चेचा आहे. कधी कधी निर्णय हा सर्वमान्य होत नाही.’
2016 साली पुणे संघाचं नाव पुणे सुपरजायंट्स होतं आणि संघाचं नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे होतं. तेव्हा त्याच्या नेतृत्वात संघाने 14 पैकी फक्त पाच सामने जिंकले होते. तसेच गुणतालिकेत पुण्याचा संघ आठ संघांमध्ये सातव्या स्थानावर राहिला. महेंद्रसिंह धोनीची बॅट काही खास चालली नव्हती. त्याने खेळलेल्या 12 डावात फक्त 284 धावा केल्या होत्या. मग 2017 साली धोनीला अचानक पदावरून दूर केलं गेलं. तसेचं संघाचं नाव रायझिंग पुणे सुपरजायंट केलं गेलं.