राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफचं गणित लांबल्याने संजू सॅमसन वैतागला! खेळाडूंना सरळ स्पष्टच सांगितलं की..
आयपीएल 2024 स्पर्धेतील 61वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा दिसला. त्यामुळे पुन्हा राजस्थानचं प्लेऑफमध्ये अधिकृतरित्या पात्र होण्याचं स्वप्न भंगलं. आता अजून एखाद सामना वाट पाहावी लागणार आहे. तसेच टॉप 2 मध्ये राहण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. आता फक्त 10 ते 12 सामने शिल्लक आहेत. यामुळे प्रत्येक सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हा सामना देखील खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचंही लक्ष लागून होतं. कारण चेन्नई सुपर किंग्सच्या 14 गुण झाले की सर्वच फिस्कटणार होतं. पण झालंही तसंच, चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकला आणि 14 गुणांसह तिसरं स्थान गाठलं. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमध्ये अधिकृतरित्या जाण्याचं स्वप्न अजून लांबलं आहे. मागच्या तीन सामन्यापासून राजस्थानला विजय मिळवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये कधी स्थान मिळणार याची उत्सुकता ताणली जात आहे. इतकंच काय तर पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहणं फायद्याचं ठरणार आहे. अन्यथा फायनलपर्यंतचा मार्ग आणखी किचकट होईल. हेच डोक्यात ठेवून सामना जिंकणं किती महत्त्वाचं हे अधोरेखित होतं. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 141 धावा केल्या आणि विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान चेन्नईने 18.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने मनमोकळेपणाने सांगितलं.
“पॉवर प्लेनंतर आम्हाला 170 धावांची अपेक्षा होती. पण आम्ही 20-25 धावा कमी केल्या. सिमरजीतने चांगली गोलंदाजी केली. आम्हाला वाटलं की प्रथम फलंदाजी करणं चांगलं राहील. त्यांना धावसंख्या गाठण्याची बऱ्यापैकी आयडिया होती. आम्हाला वाटलं की दुसऱ्या डावात विकेट आणखी स्लो होऊ शकते. पण विकेट चांगली राहिली. रात्रीच्या वेळेत दव फॅक्टर डोक्यात असतं त्यामुळे धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. ही खेळपट्टी उन्हाने बरीच तापली होती. त्यामुळे संथ होईल अशी अपेक्षा होती. पण आपल्या हातात जे काही आहे त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे.”, असं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने सांगितलं.
“मी माझ्या संघ सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. या प्रक्रियेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. मला आशा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही नक्कीच जिंकू.”, असं संजू सॅमसन याने सांगितलं. राजस्थान रॉयल्सचे उर्वरित दोन सामने पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या विरुद्ध आहेत. 15 मे रोजी पंजाब किंग्स, तर 19 मे रोजी कोलकात्याशी सामना होईल.