Sara Tendulkar | सोशल मीडियावर शुबमन गिलसोबत फेक फोटो, सारा तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया
Sara Tendulkar Insta Story | नेटकऱ्यांकडून आतापर्यंत अनेकदा सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल या दोघांचं नाव जोडण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुबमन या दोघांचा फेक एडीटेड फोटो व्हायरल झाला होता. यावरुन आता साराने इंस्टा पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई | तंत्रज्ञान शाप की वरदान असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. एआय आणि अन्य तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी या सोप्या झाल्या आहेत. मात्र तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत अनेक उलटसुलट गोष्टी केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने फोटो आणि व्हीडिओमध्ये छेडछाड करुन संबधित व्यक्तिला त्रास देण्याचा तसेच बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रशमिका मंधाना ही डीपफेकची शिकार झाली होती.
तसेच काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हीच्या फोटोसोबतही छेडछाड करण्यात आली. साराचा क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबतचा फेक फोटो व्हायरल करण्यात आला होता. साराचा मुळ फोटो हा तिचा भाऊ आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याच्यासोबतचा होता. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्जुनच्या जागी शुबमनचा फोटो लावून तो फोटो व्हायरल करण्यात आला होता. इतकंच नाही, तर सारा तेंडुलकर या नावाने एक्स अकाउंटवर (ट्विटर) शुबमन गिल याच्यासोबतचा फेक फोटो शेअर करण्यात आला. .
आता यावरुन साराने इंस्टाग्रामवरुन जाहीरपणे भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. साराने इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून तिच्या नावाचा गैरवापर करुन फेक अकाउंट्सवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे फेक अकाउंट लवकरात लवकर हटवण्याची गरज असल्याचंही साराने म्हटलंय.
साराने इंस्टा स्टोरीमध्ये काय म्हटलंय?
“सोशल मीडिया आपल्या सर्वांसाठी आनंद, दु:ख आणि दररोजत्या आयुष्यातील घडामोडी शेअर करण्याचं व्यासपीठ आहे. मात्र याचा दुरुपयोग ही चिंताजनक बाब आहे.”, असं साराने म्हटलंय.
सारा तेंडुलकर हीची इंस्टा स्टोरी
“मी काही पाहिलंय. माझे डीपफेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.माझ्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट असल्याचं माझ्या निदर्शनात आलं आहे. जाहीरपणे लोकांची दिशाभूल करण्याच्या हेतून हे अकाउंट्स तयार करण्यात आले आहेत. माझं एक्सवर अकाउंट नाही. एक्सकडून या फेक एक्स अकाउंट्सवर कारवाई केली जाईल अशी आशा आहे.”, असं साराने म्हटलंय.