मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) सीजन संपल्यानंतर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका होणार आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच टी-2० सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांच्यावेळी काही नवीन चेहरे दिसू शकतात. सध्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat kohli) फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. तो फॉर्म मिळवण्यासाठी झगडतोय. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये कोहलीने फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. विराटने आयपीएलच्या या सीजनमध्ये 12 इनिंग्समध्ये फक्त 216 धावा केल्यात. विराटच्या खराब फॉर्ममुळे त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेत संघात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान आता नवीन माहिती समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती संघ निवडण्याआधी कोहलीशी चर्चा करणार आहे. कोहलीला खरोखर ब्रेकची गरज आहे का? हे निवड समिती त्याच्याशी चर्चा करुन जाणून घेणार आहे.
“अशा फेजमधून प्रत्येक खेळाडू जातो. विराटही त्याच फेजमधून जातोय. तो नक्कीच यातून बाहेर येईल. पण सिलेक्टर्स या नात्याने आम्हाला पहिला संघाचा विचार करावा लागतो. आम्ही त्यांच्याशी चर्चा करु. क्रिकेटपासून त्याला ब्रेक हवा आहे की, तो क्रिकेट खेळण सुरुच ठेवणारय, हे त्याच्याशी बोलल्यानंतरच समजेल” असं निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पहिल्या चेंडूवर आऊट होऊन विराटने सीजनमध्ये सर्वाधिक गोल्ड डकचा रेकॉर्ड मोडला. 12 सामन्यात त्याने 19.64 च्या सरासरीने धावा केल्यात. आयपीएलच्या मागच्या 10 सीजनमधील ही त्याची सर्वात खराब कामगिरी आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती दिली जाईल.
अनेक माजी क्रिकेटपटूंनी विराटला क्रिकेटपासून ब्रेक घेऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं मात्र वेगळ मत आहे. विराटने विश्रांती घेण्याऐवजी क्रिकेट खेळणं सुरुच ठेवाव. त्याला तसाच त्याचा फॉर्म परत मिळू शकतो, असं गावस्करांच मत आहे.