गौतम गंभीरला थांबण्यासाठी शाहरुख खानची मोठी खेळी! ‘ती’ बातमी कानावर पडताच दिली मोठी ऑफर
आयपीएलचं 17वं पर्व शाहरूख खानसाठी आनंददायी ठरलं. शाहरुखच्या सर्वकाही मनासारखं झालं. पण जेतेपद मिळवल्यानंतर शाहरुख खानला एक वेगळीच चिंता सतावत आहे. जेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरला थांबवण्यासाठी त्याने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आता त्याच्या प्रयत्नांना किती यश येतं हे महिनाभरात स्पष्ट होईल.

आयपीएल 2024 स्पर्धेत गौतम गंभीरचं नाव खऱ्या अर्थाने गाजलं. कोलकाता नाईट रायडर्सचं मेंटॉरशिप घेतल्यानंतर कोलकाता संघात सकारात्मक बदल दिसले. इतकंच काय तर कोलकाता फ्रेंचायसी लिलावापासून अंतिम सामन्यापर्यंत गंभीरच्या निर्णयामुळे चर्चेत राहिली. यामुळे गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्ससाठी किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं. त्यामुळे गौतम गंभीरला संघासोबत कायम ठेवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरूख खानने कंबर कसली आहे. बीसीसीआयने नुकतीच प्रशिक्षकपदासाठी जाहीरात दिली आहे. तसेच या पदासाठी अर्ज करण्याची 27 मे ही अंतिम तारीख आहे. प्रशिक्षकपद पुढचे 3.5 वर्षांसाठी असणार आहे. या पदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सची आतापासूनच धाकधूक वाढली आहे. कारण गौतम गंभीर एकदा का हातून गेला की, संघाची पूर्ण लय बिघडून जाईल. गंभीर एकदम कडक स्वभावाचा असल्याने संघात एक शिस्त आहे. तसेच जिंकण्यासाठीची त्याची जिद्द एक वेगळीच उर्जा देऊन जाते. त्यामुळे शाहरुख खानने त्याला स्पेशल ऑफर दिली आहे.
गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्ससोबत कायम राहावं यासाठी शाहरुख खानने त्याला ब्लँक चेक ऑफर केल्याचं वृत्त आहे. म्हणजेच शाहरुख खानला पुढील दहा वर्षांसाठी गौतम गंभीरने केकेआर संघाचा प्रमुखपदी राहावे असे वाटते. मीडिया रिपोर्टनुसार शाहरूख खानने गंभीरला सांगितलं की, आवश्यक असलेली रक्कम कोऱ्या चेकमध्ये लिहून घेऊ शकतो. या माध्यमातून गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्ससाठी किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं. आता गौतम गंभीर काय निर्णय घेतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
गौतम गंभीरने शाहरूख खानने दिलेली ऑफर स्वीकारली तर बीसीसीआयचा प्रशिक्षक होता येणार नाही. कारण भारतीय संघाच्या प्रशिक्षकाला कोणत्याही फ्रेंचायसी लीगमध्ये संघ प्रशिक्षख आणि अन्य पदावर काम करण्याची परवानगी नाही. त्यामुळे गौतम गंभीर आता काय निर्णय घेतो? याकडे लक्ष लागून आहे. गौतम गंभीर कर्णधार असताना कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता मेंटॉर म्हणून आल्यानंतर पुन्हा एकदा जेतेपद मिळालं आहे. जवळपास दहा वर्षांनी कोलकात्याने जेतेपदाची चव चाखली आहे.