मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे निधन झाले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची (Shane Warne Passes Away) माहिती समोर आली आहे. तो 52 वर्षांचा होता. वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. त्याला हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला होता.”
ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तेथे त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एका निवेदनात म्हटले आहे की, वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जेथे तो शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळला होता, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही तो शुद्धीवर येऊ शकला नाही.
निवेदनानुसार, शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तिथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनी गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले असून उर्वरित माहिती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जाईल, असे म्हटले आहे.
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 1992 मध्ये पदार्पण करणारा वॉर्न 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधारही बनला, पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवले.
इतर बातम्या
IND vs SL 1st Test: क्षणभर कोहलीलाही नाही समजलं, विराट बोल्ड झाला ‘त्या’ अप्रतिम चेंडूचा पहा VIDEO