अँजेलो मॅथ्यूज ‘टाईम आऊट’ प्रकरणात दिल्ली पोलिसांची उडी! प्रकरणाची दखल घेत केलं असं की…
अँजेलो मॅथ्यूज प्रकरण सध्या क्रीडाविश्वात गाजत आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे खेळाडू बाद झाला आहे. त्यामुळे आयसीसीची टाईम आऊट नियम चर्चेत आला आहे. आता दिल्ली पोलिसानीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीतील संघांचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे. तर चौथ्या संघासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघात चुरस आहे. असं सर्व होत असताना श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यातील अँजेलो मॅथ्यू प्रकरण काही थांबण्याचं नाव घेत नाही. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच खेळाडू अशा पद्धतीने बाद झाला आहे. टाईम आऊट प्रकरणावेळी मैदानात बराच ड्रामा पाहायला मिळाला. इतकंच काय तर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याच्याकडेही विनंती करण्यात आली. पण त्याने स्पष्ट नकार देत आयसीसी नियमांकडे बोट दाखवलं. त्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या समर्थकांची हमरीतुमरी पाहायला मिळाली. अँजेलो मॅथ्यूजने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत बांगलादेश संघावर टीकास्त्र सोडलं. असं सर्व प्रकरण गाजत असताना मध्येच दिल्ली पोलिसांची एन्ट्री झाली आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, दिल्ली पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली? कारवाई नाही तर मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे.
दिल्ली पोलिसांनी या घटनेचा उल्लेख करत एक खास संदेश दिला आहे. दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट घालणं किती महत्त्वाचं आहे, हे या माध्यमातून सांगितलं आहे. हेल्मेटसाठी दिल्ली पोलिसांनी मॅथ्यूजच्या फोटोसह साईट एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘दिल्लीकरानो, आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हेल्मेटचं महत्त्व समजलं असेलच.’ दिल्ली पोलिसांनी या माध्यमातून स्पष्ट संदेश दिला आहे की, हेल्मेट घातलं नाही तर मॅथ्यूजसारखी स्थिती ओढावेल.
Delhitees!we hope now you have understood the importance of a ‘HELMET’. #SLvBAN#CWC2023#AngeloMathews#DelhiPoliceCares pic.twitter.com/bBUkXhGDw7
— Delhi Police (@DelhiPolice) November 7, 2023
मॅथ्यूज मैदानात उतरल्यानंतर त्याला हेल्मेटची स्ट्रिप तुटल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने लगेचच दुसरं हेल्मेट आणण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा केला. त्यासाठी दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला. या दरम्यान शाकिब अल हसन याने टाईम आऊटसाठी अपील केलं आणि पंचांनी बाद घोषित केलं.
श्रीलंकेचं वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. कारण उपांत्य फेरीचं गणित विजयावर अवलंबून आहे. त्यामुळे श्रीलंका आता न्यूझीलंडची वाट अडवते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.