चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात या खेळाडूचं नाव पक्कं! झालं असं की…
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु असताना आता वेध लागले आहेत ते चॅम्पियन्स ट्रॉफीचे.. या स्पर्धेत संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. कारण टी20 वर्ल्डकप विजयानंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्यामुळे संघात कोणत्या खेळाडूंना स्थान याबाबत खलबतं सुरु आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा गुंता संपल्यानंतर भारताचे सर्व सामना दुबईत होणार आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यासाठी आठ संघांनी कंबर कसली आहे. भारताच्या गटात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. भारताचा पहिलाच सामना बांगलादेशशी 20 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला हायव्होल्टेज भारत पाकिस्तान सामना आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. असं सर्व असताना भारतीय संघात कोणते खेळाडू असतील, याबाबत खलबतं सुरु आहेत. कर्णधार रोहित शर्मा असेल यात काही शंका नाही. कारण टी20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब झालं होतं. त्याच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी खेळणार असं जाहीर केलं होतं. पण कसोटीत भारताची पिछेहाट झाली असून आता क्वॉलिफाय करेल की नाही हे गुलदस्त्यात आहे. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड कशी होते याकडे लक्ष लागले आहे.
रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा असल्यास विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचं संघात असणं जवळपास निश्चित आहे. तर टीम इंडियात एका नावाची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे श्रेयस अय्यर.. हा खेळाडू गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात नाही. श्रेयस अय्यर टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्याचा फॉर्मही जबरदस्त आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने शतकी खेळी करत आपला दावा पक्का केला आहे. विजय हजारे ट्रॉफी ही 50 षटकांची असून तग धरून ठेवणारा खेळाडू भारतीय संघात असणं आवश्यक आहे. दरम्यान, वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्यामुळे त्याचा विचार केला जाऊ शकतो. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत निवड झाली की त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीतही समावेश होईल यात शंका नाही.
विजय हजारे ट्रॉफीत श्रेयस अय्यरने पुडुचेरीविरुद्द 133 चेंडूत नाबाद 137 धावा केल्या. यावेळी त्याने 16 चौकार आणि 4 षटकार मारले. स्पोर्ट्सतकच्या अहवालानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. पण बीसीसीआय निवड समिती भारताचा संघ एक दिवस आधीच म्हणजे, 11 जानेवारी रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर होत आहे. 2017 मध्ये शेवटच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा अंतिम फेरीत पराभव केला होता.