Team India : रोहित शर्मा याच्यानंतर कर्णधारपदाची धुरा या खेळाडूकडे! सोशल मीडियावर रंगली चर्चा
टीम इंडिया सध्या विंडीज दौऱ्यावर असून रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ खेळत आहे. पण या दौऱ्यातही प्रयोग करण्यात आले. दुसरीकडे, आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपण्यात आलं आहे.
मुंबई : भारतीय संघात गेल्या महिन्यांपासून वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. इतकंच काय तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही आराम दिला गेला आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्या याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. त्यात आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. त्यातही दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण असं असताना टीम इंडियाचं कसोटीचं नेतृत्व रोहित शर्मा याच्यानंतर कोण सांभाळू शकेल याबाबत चर्चा रंगली आहे. यासाठी श्रेयस अय्यर याच्या नावाची चर्चा सुरु आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा टीम इंडियातील अनेक वरिष्ठ खेळाडूंचा शेवटचा विश्वकप ठरू शकतो. या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.कर्णधारापासून ते खेळाडूंमध्ये बदल होऊ शकतात. कसोटी संघातही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा 36 वर्षांच्या असल्याने पुढच्या काळात संधी मिळणं कठीण आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा कसोटीमधील नवीन कर्णधार कोण असेल यावर सोशल मीडियावर अनेक चर्चा होताना दिसत आहेत.श्रीलंकेचा माजी खेळाडू चमिंडा वास यानेही आपलं मत व्यक्त केलं आहे.
नेमकं काय म्हणाला चमिंडा वास?
“रोहित शर्मा याच्यानंतर कसोटीत श्रेयस अय्यर हा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी बजावू शकतो. उत्तम कर्णधार बनण्याचे अनेक गुण त्याच्याजवळ आहेत.माझ्या दृष्टीकोनातून तो संघाला उत्तम प्रकारे सांभाळू शकतो.श्रेयस अय्यर हा टीमला यशाच्या वाटचालीकडे नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे.”, असं चमिंडा वास याने सांगितलं.
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सध्या संघाच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत त्याच्या पाठिला दुखापत झाली होती. तेव्हापासून संघातून बाहेर आहे. आता बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीत रिकव्हर होत आहे आणि वनडे वर्ल्डकप संघात पुनरागमन करेल अशी आशा आहे. मीडिया रिपोर्टनुसार , श्रेयस अय्यर 31 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत खेळू शकतो.
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत अय्यरचं संघात पुनरागमन झालं तर संघाला ताकद मिळेल. अय्यरने मधल्या फळीत उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या अनुपस्थित अनेक खेळाडू या जागी फेल ठरले आहेत.