मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 234 धावांचं मोठं आव्हान मुंबईला दिलं आहे. क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना झोडपून काढलं. शुबमनने मुंबई विरुद्ध 129 धावांची नाबाद शतकी खेळी केली.
गिलने शुक्रवारी दमदार शतकी खेळी खेळली, 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. चालू हंगामातील आणि आयपीएल कारकिर्दीतील हे त्याचे तिसरे शतक आहे. शतकासह त्याने स्टार खेळाडू विराट कोहलीच्या खास क्लबमध्येही सामील झाला आहे.
एकाच मोसमात तीन किंवा त्याहून अधिक शतके करणारा गिल हा दुसरा भारतीय ठरला आहे. कोहलीने 2016 मध्ये चार शतके झळकावली होती. 16 व्या मोसमात तीन शतके झळकावणारा गिल हा एकमेव खेळाडू आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा तो फलंदाज बनला आहे.
एका मोसमात 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा गिल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीने 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या. याशिवाय गिलने माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा एक जबरदस्त रेकॉर्ड मोडलाय. सेहवागने आयपीएल 2014 च्या प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 122 धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर गिल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. केवळ केएल राहुल त्याच्या पुढे आहे, ज्याने स्पर्धेत नाबाद 132 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या आणि मुरली विजय चौथ्या स्थानावर आहे. पंतने नाबाद 128 आणि मुरलीने 127 धावांची खेळी केली आहे.
शुबमन व्यतिरिक्त गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 18 धावा केल्या. साई सुदर्श 43 धावांवर दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर पडला. तर हार्दिक पंड्या याने नाबाद 28 धावा केल्या. तर राशिद खान 5 धावा करुन नाबाद परतला. मुंबईकडून आकाश मढवाल आणि पियूष चावला या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.