IND vs AUS ODI Series : बॉर्डर-गावस्कर सीरीजनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. दोन्ही टीम्समध्ये आजपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना होणार आहे. टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला. आता वनडे सीरीजमध्येही टीम इंडियाने तशीच कामगिरी करावी, अशी कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. यावर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे.
त्या दृष्टीने तयारीचा भाग म्हणून भारत-ऑस्ट्रेलियासाठी ही वनडे सीरीज महत्त्वाची आहे. या वनडे सीरीजच्या निमित्ताने दोन्ही टीम्सना परस्परांच बलस्थान, कच्चे दुवे लक्षात येतील. त्याचा फायदा वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी होईल.
या दोन तारखां दरम्यानच अंतर 1268 दिवस
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजमध्ये 1268 दिवसात फक्त 3 वनडे सामना खेळणारा प्लेयर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय, त्याने 31 जानेवारी 2019 रोजी वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर हा खेळाडू 21 जुलै 2022 पर्यंत फक्त 2 वनडे सामने खेळू शकला. या दोन तारखां दरम्यानच अंतर 1268 दिवस आहे. या खेळाडूच नाव आहे शुभमन गिल. तो या 1268 दिवसांमध्ये फक्त 3 वनडे सामने खेळला आहे.
त्याने मागे वळून पाहिलेलं नाही
असं म्हणतात प्रत्येकाला दुसरी संधी मिळते. 1268 दिवसानंतर शुभमन गिलला ही संधी मिळाली. 22 जुलै 2022 रोजी तो आपला चौथा वनडे सामना खेळला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही.
पहिल्या तीन वनडेत 49 धावा
शुभमन गिलने पहिल्या तीन वनडे सामन्यात जितक्या धावा केल्यात नाहीत, त्यापेक्षा 15 धावा जास्त त्याने चौथ्या वनडेमध्ये केल्या. चौथ्या वनडेमध्ये शुभमनने 64 धावांची खेळी केली. पहिल्या तीन वनडे सामन्यात मिळून त्याने 49 धावा केल्या होत्या.
त्याची 4 शतक आणि 5 अर्धशतक
22 जुलै 2022 पासून शुभमन गिल आतापर्यंत 18 वनडे सामने खेळला असून त्याने 86.07 च्या सरासरीने 1205 धावा केल्या आहेत. यात 4 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. अन्य फलंदाजांबद्दल बोलायच झाल्यास अन्य कोणी 684 पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत.
तो टीम इंडियाच मुख्य अस्त्र
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला शुभमन गिलपासून सर्वात जास्त धोका असेल. तो टीम इंडियाच मुख्य अस्त्र असेल. 2023 मध्येही शुभमन गिलच दमदार प्रदर्शन कायम आहे. त्याने यावर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 इनिंगमध्ये 71 च्या सरासरीने 935 धावा केल्या आहेत. यात 5 सेंच्युरी आहेत.