SL vs AGf : श्रीलंकेने काढला पराभवाचा वचपा, अफगाणिस्तानवर 132 धावांनी विजय
अफगाणिस्तान क्रिकेट टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका क्रिकेट टीमचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला होता. या सामन्यात श्रीलंका संघाने मुसंडी मारली आहे.
मुंबई : श्रीलंकेने रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानवर 132 धावांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना दिमुथ करुणारत्ने (52) आणि कुसल मेंडिस (78) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमानांनी अफगाणिस्तानसमोर 324 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात हशमतुल्ला शाहिदी (57) आणि इब्राहिम झद्रान (54) यांची अर्धशतकं वगळता अफगाणिस्तानचा डाव 191 धावांच्या आत आटोपला.
श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि धनंजया डी सिल्वा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. चमीराने दोन तर शनाका आणि तीक्ष्णा यांनी एक बळी घेतला. दिमुथ करुणारत्ने आणि पाथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. निसांकाने 56 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या, तर करुणारत्नेने 62 चेंडूत 52 धावा केल्या.
Sri Lanka draw level with a thumping win in the second ODI ?#SLvAFG | ?: https://t.co/cdkKuUY0SB pic.twitter.com/Ip33HdCfNX
— ICC (@ICC) June 4, 2023
अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर आलेल्या कुसल मेंडिसने सदीरा समरवाक्रिमासोबत 88 धावांची भागीदारी करत 75 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्या. समरावक्रिमानेही पाच चौकारांच्या मदतीने 44 धावांचे योगदान दिले.
चरित अस्लंका (12 चेंडू, 6 धावा) छोट्या धावसंख्येवर बाद झाले असतील, पण डी सिल्वा (24 चेंडू, 29 धावा), दासुन शनाका (13 चेंडू, 23 धावा) आणि हसरंगा (12 चेंडू, 29 धावा) यांनी संघाला 300 चा आकडा पार करण्यास मदत केली. श्रीलंकेने अफगाणिस्तान संघाला 324 धावांचं आव्हान दिलं होतं.
या भव्य लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अफगाणिस्तान संघाची सुरूवात एकदम खराब झाली. चौथ्याच ओव्हरमध्ये चमिराने गुरबाजला बाद करत पहिल झटका दिला. त्यानंतर हशमतुल्ला शाहिदी 57 धावा, इब्राहिम झद्रान 54 धावा आणि राहमक शहा 36 धावा या तिघांव्यतिरिक्त कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.
अफगाणिस्तानच्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. हसरंगा आणि डिसिल्वा यांच्या फिरकीसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली असून तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.