SL vs BAN Super 4 | श्रीलंकेचा रंगतदार सामन्यात 21 धावांनी विजय, बांगलादेश आशिया कपमधून ‘आऊट’
Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Super 4 | श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर बांगलागदेशने अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र बांगलादेशचे प्रयत्न अवघ्या 21 धावांसाठी कमी पडले.
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील रंगतदार झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका क्रिकेट टीमने बांगलादेशवर 21 धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशनेही अखेरपर्यंत चांगली झुंज दिली. तॉहीद हृदाय याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. मात्र श्रीलंकेच्या महीश थेक्षणा, दासून शनाका आणि मथीशा पथीराणा या तिघांनी बांगलादेशला 48.1 ओव्हरमध्ये 236 धावांवर गुंडाळलं. श्रीलंकेने या विजयासह सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात केली. तर बांगलादेशचा सुपर 4 राऊंडमधील सलग दुसरा पराभव ठरला. तसेच श्रीलंकेचा हा सलग 13 वनडे विजय ठरलाय. सोबतच श्रीलंकेने 13 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करण्याचा कीर्तीमान केलाय.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेशची 258 धावांचं पाठलाग करताना दमदार सुरुवात झाली. मोहम्मद नईम आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी 55 धावांची सलामी भागीदारी केली.त्यानंतर मेहदी हसन हा 28 धावा करुन तंबूत परतला. इथून विकेट पडण्याची सुरुवात झाली. मोहम्मद नईम 21, कॅप्टन शाकिब अल हसन 3 आणि लिटॉन दास याने 15 धावा केल्या. त्यानंतर मुशफिकर रहीम आणि तॉहीद हृदॉय या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. मुशफिकीर रहीम 29 धावांवर आऊट झाला. मात्र त्यानंतर तॉहीदने शेपटीच्या खेळाडूंना हाताशी घेत किल्ला लढवला. तॉहीदने बांगलादेशला सामन्यात कायम ठेवलं. या दरम्यान शमीम होसैन 5 धावांवर आऊट झाला.
श्रीलंकेचा सलग 13 वा विजय
Sri Lanka emerges victorious, wrap it up by 21 runs! Takes two points.✌️#AsiaCup2023 #SLvBAN #LankanLions pic.twitter.com/oyMLPRvCiX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 9, 2023
त्यानंतर बांगलादेशची अखेरची आशा असेलला तॉहीदही आऊट झाला. तॉहीदने 97 बॉलमध्ये 1 सिक्स 7 फोरच्या मदतीने 82 धावा केल्या. तॉहीदनंतर तास्किन अहमद 1 आणि शोरिफूल इस्लाम 8 रन्सवर आऊट झाला. इस्लाम आऊट झाल्याने बांगलादेशची 46.1 ओव्हरमध्ये 9 बाद 216 अशी स्थिती झाली.
मात्र त्यानंतरही हसन महमूद आणि नसूम अहमद या दोघांनी आपला दम दाखवत काही मोठे फटके मारले. मात्र दोघांना काही विजय मिळवून देता आला नाही. नसूम अहमद आऊट झाला आणि बांगलादेश 236 धावांवर ऑलआऊट झाली. नसूमने 1 सिक्ससह 15 बॉल 15 धावा केल्या. तर हसन महमूद 10 धावांवर माघारी परतला. श्रीलंकेकडून महीश थेक्षणा, दासून शनाका आणि मथीशा पथीराणा या त्रिकुटाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर दुनिथ वेलगाने याने 1 विकेट घेतल तिघांना चांगली साथ दिली.
बांगलादेशने टॉस जिंकला
त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक 93 धावांची खेळी केली. पाथून निसांका याने 40 धावांच योगदान दिलं. कुसल मेंडिस याने अर्धशतक झळकावलं. कॅप्टन दासून शनाका याने 24 धावा केल्या. करुणारत्ने याने 18 आणि असलंका याने 10 रन्स केल्या. कसुन राजिथा याने नाबाद 1 धाव केली. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अशा प्रकारे श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 257 धावा केल्या.
बांगलादेशकडून तास्किन अहमद आणि हसन महमूद याने प्रत्येकी 3-3 जणांचा काटा काढला. तर शोरिफूल इस्लाम याने 2 विकेट्स घेतल्या. दरम्यान सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना रंगणार आहे.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.