टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात श्रीलंके विरुद्धची 3 टी20i सामन्यांची मालिका ही 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला आहे. मालिकेतील तिसरा सामना हा बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरने निर्णय लागला. टीम इंडियाने श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 3 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाकडून कर्णधार-उपकर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात आली. सूर्यकुमारने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.
श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावाच करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर याने सुपर ओव्हरमध्ये कुसल परेरा आणि पाथुम निसांका या दोघांना आऊट केलं. श्रीलंकेचे फलंदाज सुपर ओव्हरमध्ये अपयशी ठरले. सुंदरने अप्रतिम बॉलिंग केल्याने ते शक्य झालं. त्यामुळे भारताला फक्त 3 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केलं आणि भारताला सहज आणि सोपा असा विजय मिळवून दिला. सूर्याने या विजयासह पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपल्या नेतृत्वात भारताला क्लीन स्वीपसह मालिका जिंकून दिली.
3⃣-0⃣ 🙌@Sundarwashi5 with a ‘super’ over and Captain @surya_14kumar with the winning runs! 😎
Scorecard ▶️ https://t.co/UYBWDRh1op#SLvIND pic.twitter.com/KoNf4OFJHq
— BCCI (@BCCI) July 30, 2024
त्याआधी भारताने विजयासाठी दिलेल्या 138 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18 व्या ओव्हरपर्यंत सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. पाथुम निसांका 26 आणि कुसल मेंडीसच्या 43 धावांच्या जोरावर श्रीलंका मजबूत स्थितीत पोहचली होती. लंकेला शेवटच्या 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावांची गरज होती. मैदानात सेट असलेला कुसल परेरा होता. त्यामुळे श्रीलंकेला विजय दिसत होता. सूर्याने 19 वी ओव्हर रिंकू सिंह याला दिली. सूर्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र रिंकूने सूर्याचा विश्वास सार्थ ठरवला. रिंकूने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्या आंतरराष्ट्रीय ओव्हरमध्ये फक्त 3 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. रिंकूने कुसल परेरा (46) रमेश मेंडीस (3) या दोघांना आऊट केलं.
आता सामना बॉल टु बॉल आला होता. कॅप्टन सूर्याने स्वत: शेवटची ओव्हर टाकायचा निर्णय घेतला. सूर्याने आपल्या ओव्हरमध्ये रिंकूप्रमाणे 2 विकेट्स घेतल्या. सूर्याने कमिंडू मेंडीस (1) आणि महीश तीक्षणा (0) यांना आऊट केलं. त्यानंतर चामिंदू विक्रमसिंघे आणि असिथा फर्नांडो हे मैदानात होते. सामना आता शेवटच्या बॉलपर्यंत पोहचला होता. श्रीलंकेला विजयासाठी 3 धावांची गरज होती. मात्र श्रीलंकेला 2 धावाच करता आल्याने सामना बरोबरीत सुटला.
दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांव्यतिरिक्तत एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. शुबमन गिल याने 39, यशस्वी जयस्वाल याने 10, शिवम दुबने 13, रियान पराग याने 26 तर वॉशिंग्टन सुंदर याने 25 धावा जोडल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वानिंदु हसरंगा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर आर मेंडीस, चामिंडू विक्रमसिंघे आणि असिथा फर्नांडो या तिघांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.