दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेचं कमबॅक, वेस्ट इंडिजचा 73 धावांनी केला पराभव

| Updated on: Oct 15, 2024 | 10:11 PM

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी20 सामना जिंकत श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. वेस्ट इंडिजकडून एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही.

दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेचं कमबॅक, वेस्ट इंडिजचा 73 धावांनी केला पराभव
Image Credit source: Twitter
Follow us on

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना श्रीलंकेसाठी खूपच महत्त्वाचा होता. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी दुसरा सामना जिंकणं आवश्यक होतं. श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजची बरोबर कोंडी केली. श्रीलंकेला खेळपट्टीचा चांगला अंदाज होता. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर लगेचच पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने सावध पण 7.67 धावांची धावगती राखत 5 गडी गमवून 162 धावा केल्या. तसेच विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पहिल्या टी20 सामन्याप्रमाणे सहज गाठेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. वेस्ट इंडिजचा डावा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. एक फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. आघाडीचे फलंदाज तर एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. दुनिथ वेल्लालगेने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात फक्त 9 धावा देत 3 गडी बाद केले. तर महीश थीक्षाणाने 2, चरीथ असलंकाने 2, वानिंदू हसरंगाने 2 आणि मथीशा पथिरानाने 1 गडी बाद केला.

खेळपट्टीचा अंदाज असल्याने श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेकीवेळीच धावांचा अंदाज वर्तवला होता. या खेळपट्टीवर 160-170 इतकी धावसंख्या खूप असेल, असं त्याने तेव्हाच स्पष्ट केलं होतं. झालंही तसंच..श्रीलंकने ठरल्याप्रमाणे 20 षटकात 5 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. पण वेस्ट इंडिजचा डाव या धावांचा पाठलाग करताना गडगडला. वेस्ट इंडिज संघ सर्व गडी बाद फक्त 89 धावा करू शकला. श्रीलंकेने वेस्ट इंडिजला 73 धावांनी पराभूत केलं आणि मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याच्या खिशात ही मालिका जाणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत क्रीडारसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, आंद्रे फ्लेचर (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, शमर स्प्रिंगर, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, शामर जोसेफ

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.