4,4,4,4,4,4,4,4,4,6 ! स्मृती मंधानाची अर्धशतकी खेळी, टीम इंडिया अंतिम फेरीत
वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात स्मृती मंधानाच्या बॅट चांगलीच तळपली. अर्धशतकी खेळी करत फक्त 11 षटकात विजय मिळवून दिला.
वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय फसल्याचं पहिल्याच डावात दिसून आलं. बांग्लादेशने 20 षटकात 8 गडी गमवून 80 धावा केल्या आणि विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 11 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना श्रीलंका किंवा पाकिस्तान या संघाशी होईल. या सामन्यात स्मृती मंधानाने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. 39 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.
स्मृती मंधानाला पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली. तेव्हा तिने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत हेतू स्पष्ट केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत बांग्लादेशला बॅकफूटवर ढकललं. मंधाना 34 चेंडूत 43 धावांवर असताना 11 व्या षटकात स्ट्राईक मिळाली. तेव्हा पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर नहिदा अक्तरला सलग तीन चौकार मारले. दुसऱ्या चौकारावर तिने अर्धशतक साजरं केलं आणि तिसऱ्या चौकारावर विजय साजरा केला.
दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरने विजयानंतर खेळाडूंचं कौतुक केलं. “आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही जी काही चर्चा केली होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आमच्यावर खूप दडपणआहे कारण आमचं आशिया क्रिकेटमध्ये वर्चस्व आहे. पण बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. आम्ही मैदानात उतरलो आणि करून दाखवलं. नेटमध्येही आम्ही घाम गाळला आहे. सातत्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहेआम्ही आता श्रीलंका आणि पाकिस्तान सामना आज बघू. त्यानंतर आमची रणनिती ठरवू.”, असं हरमनप्रीत कौरने सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (डब्ल्यू), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.
बांग्लादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्तर, मुर्शिदा खातून, निगार सुलताना (कर्णधार/विकेटकीपर), रुमाना अहमद, इश्मा तंजीम, रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अक्तर, नाहिदा अक्टर, जहांआरा आलम, मारुफा अक्तर