Video : 6 मिनिटं लेट होऊनही सौरव गांगुलीला मिळालेलं जीवदान, 16 वर्षापूर्वी काय झालं होतं ते जाणून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट बाद दिल्यानंतर बरीच चर्चा रंगली आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे कोणता खेळाडू बाद झाला आहे. पण अशीच घटना 16 वर्षांपूर्वी सौरव गांगुलीसोबत घडली असती. तेव्हा नेमकं काय झालं ते समजून घ्या
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना क्रीडाप्रेमींच्या कायमचा लक्षात राहील. या स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूज ज्या पद्धतीने बाद झाला, त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेकांना तर टाईम आऊट हा नियम देखील माहिती नाही. त्यामुळे खरंच असा नियम आहे का? इथपासून यापूर्वी असं काय घडलं आहे का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मॅथ्यूज याच्या आधी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली टाईम आऊट होताना वाचला आहे. ही घटना आजपासून 16 वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हा दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार ग्रीम स्मिथ मनाचा मोठेपणा दाखवला आणि अपील केली नाही. सौरव गांगुलीला मैदानात उतरण्यासाठी 6 मिनिटांचा अवधी लागला होता. नेमकं काय झालं होतं ते जाणून घेऊयात..
2007 साली टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर होती. दोन्ही संघांमध्ये केपटाउनमध्ये कसोटी सामना खेळला जात होता. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने आपल्या दुसऱ्या डावात तीन षटकात 6 धावांवर दोन सलामी फलंदाज गमावले होते. वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर स्वस्तात बाद झाले होते. यानंतर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी उतरणार होता. पण काही वेळेसाठा सचिन बाहेर गेला होता. त्यामुळे वेळेत पोहोचू शकला नाही.
व्हीव्हीएस लक्ष्मण अंघोळीसाठी गेला होता. या दरम्यान सौरव गांगुली ट्रॅकसूटमध्ये फिरत होता. त्याला तयार होऊन मैदानात उतरायचं होतं. त्यामुळे गांगुलीला तयार करण्यासाठी स्टाफची धडपड सुरु झाली. इतकं करूनही सौरव गांगुलीला मैदानात उतरण्यासाठी 6 मिनिटांचा अवधी लागला होता. नियमानुसार 3 मिनिटात मैदानात बॉल खेळणं गरजेचं आहे.
पंचांनी यावेळी दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार ग्रीम स्मिथ याला सर्व नियम समजावून सांगितले होते. पम स्टीव्ह स्मिथने टाईम आऊटसाठी अपील केली नाही. त्याने खेळ भावनेचा आदर केला. त्यामुळे टाईम आऊटचा पहिला बळी ठरण्याचा नकोसा मान हुकला.
श्रीलंका बांगलादेश सामन्यात चित्र या उलट होतं. अँजेलो मॅथ्यूज वेळेत पोहोचला होता. पण हेल्मेटची स्ट्रिप तुटल्याने बॉल फेस करण्यास अवधी लागला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने अपील केलं आणि त्याला टाईम आऊट देण्यात आलं.