IND vs SL : विराट कोहली आणि शुबमन गिल यांना ‘गिफ्ट’ देणं पडलं महागात, 189 धावांचा बसला फटका
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यातील विजय श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताला कमी धावसंख्येवर रोखणं गरजेचं आहे. पण भर मैदानात झालं असं की श्रीलंकन कर्णधार वैतागला.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 33 वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु आहे. हा सामना भारताचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणार आहे. त्यामुळे भारताला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. पराभवामुळे श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान बिकट होईल. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही अंशी बरोबर ठरला असंच म्हणावं लागेल. मदुशंकाने दुसऱ्या चेंडूवरच रोहित शर्माला तंबूत पाठवलं आणि भारतावर दबाव बनवला. विराट कोहली आणि शुबमन गिल गोलंदाजांचा सामना करताना चाचपडताना दिसले. पण त्या संधीचं श्रीलंकेला सोनं करता आलं नाही. इतकंच काय तर दोन झेल सोडल्याने 189 धावांचा फटका बसला असंच म्हणावं लागेल.
पाचव्या आणि सहाव्या षटकात शुबमन गिल आणि विराट कोहली यांचा झेल सोडला. पाचवं षटक दिलशान मधुशंका टाकत होता. त्याने ऑफ स्टंपबाहेर चेंडू टाकला म्हणून गिलला पुढे येऊन खेळावं लागलं. हा चेंडू थेट पॉइंटला चरिता असालंका याच्याकडे गेला. चेंडू हवेत होता आणि डाव्या बाजूला उडी मारून पकडण्यासाठी प्रयत्न केला. पण त्या संधीचा फायदा घेता आला नाही. हा झेल सोडला तेव्हा गिलने फक्त 9 धावा केल्या होत्या.
View this post on Instagram
सहाव्या षटकात असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. दुश्मांता चामीरा याने सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीचा कॅच सोडला. चामीराने ऑफ स्टंपवर बॉल टाकला आणि चेंडू थांबत बॅटवर आला. त्यामुळे शॉट खेळताना विराट कोहली चुकला आणि बॉल चमीराजवळ आला. त्याने उडी घेऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण हातात आलेला कॅच सुटला आणि विराट कोहलीला जीवदान मिळालं.
विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 189 धावांची भागीदारी केली. पण दोघांचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. शुबमन गिल 92, तर विराट कोहली 88 धावा करून बाद झाला. दोघांच्या भागीदारीमुळे भारत 300 च्या पार धावा करेल असं दिसत आहे.