ENG vs SL : ड्रेसिंग रुममध्ये आग! इंग्लंडमध्ये गेलेल्या श्रीलंकन संघाची पळापळ, जाणून घ्या प्रकरण
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका 21 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या मालिकेपूर्वीच एका घटनेनं खळबळ उडाली आहे. पण त्या घटनेनं श्रीलंकन संघाची पळापळ झाली आणि नंतर कळलं की...
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. जवळपास 8 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेचा संघ इंग्लंडला गेला आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी श्रीलंकन संघाची पळापळ झाली. सराव करताना एक विचित्र घटना घडली आणि श्रीलंकन संघाची धाकधूक वाढली. मिडिया रिपोर्टनुसार, ड्रेसिंग रुममधील फायर अलार्म वाजला आणि संघाला बाहेर काढण्यात आलं. अलार्म वाजणं म्हणजेच ड्रेसिंग रुममध्ये कुठेतरी आग लागल्याचं दर्शवत होतं. पण श्रीलंकन संघाच्या ड्रेसिंग रुमची तपासणी केल्यावर तसंच काहीच घडलं नसल्याचं समोर आलं. 15 मिनिटं तपासणी केल्यानंतर संघाला पुन्हा एकदा ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पण त्याआधी श्रीलंकन संघाची तिथून निघण्यासाठी धावपळ उडाली होती.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 21 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतग्रस्त असल्याने ही कर्णधारपदाची जबाबदारी ओली पोपकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार हा हॅरी ब्रुक असणार आहे. इंग्लंडने नुकतंच वेस्ट इंडिजला 3-0 ने व्हाईट वॉश दिला होता. तर श्रीलंकेने बांगलादेशला 2-0 ने मात दिली होती. पण श्रीलंकेला इंग्लंडमध्ये सीरिज जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. दोन्ही संघात आतापर्यंत 36 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडने 17, तर श्रीलंकेने 8 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 11 सामने बरोबरीत सुटले आहेत. पहिला कसोटी 21 ऑगस्टला, दुसरा कसोटी सामना 29 ऑगस्टला, तर तिसरा कसोटी सामना 6 सप्टेंबरला होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : डॅन लॉरेंस, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रुक (उपकर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वूड, शोएब बशीर.
श्रीलंका टीम: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुश्का, पथुम निसांका, कुसल मेंडिस (उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंडु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कासुन राजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थरका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफरी वेंडरसे, मिलन रत्नाया.