Captaincy : कसोटी मालिकेसाठी पुन्हा माजी कर्णधाराकडे नेतृत्व, निवड समितीचा मोठा निर्णय
Test Cricket Captaincy : आगामी 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड समिती पुन्हा एकदा माजी कर्णधाराकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. जाणून घ्या.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट निवड समितीने आगामी श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया श्रीलंका दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. निवड समिताने 2 सामन्यांसाठी 16 खेळाडूंना संधी दिली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ हा या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे.
स्टीव्हन स्मिथ कर्णधार
पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार आहे. पॅटने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून दिली. मात्र त्यानंतर पॅट कमिन्स श्रीलंका दौऱ्यात खेळणार नाही. पॅट कमिन्सने हे आधीच क्रिकेट बोर्डाला सांगितलं होतं. पॅट पुन्हा एकदा बापमाणूस होणार आहे. त्यामुळे पॅट अशा महत्त्वाच्या क्षणी कुटुंबासोबत राहणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया निवड समितीने अनुभवी स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्वाची धुरा देण्याचं ठरवलंय.
उभयसंघातील कसोटी मालिकेला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील दोन्ही सामने हे गाले येथेच खेळवण्यात येणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप 2023-2025 या साखळीतील शेवटची मालिका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया या मालिकेत स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तिघांवर मोठी जबाबदारी
दरम्यान पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत तिघांवर गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे. मिचेल स्टार्क, सीन एबॉट आणि स्कॉट बोलँड या तिघांवर वेगवान गोलंदाजाची मदार असणार आहे. तसेच या मालिकेसाठी पहिल्यांदाच माजी अंडर 19 वर्ल्ड कप कर्णधार कूपर कोनोली याला संधी देणअयात आली आहे. तसेच नॅथन मॅकस्वीनी याचंही कमबॅक झालं आहे. नॅथनला बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान वगळण्यात आलं होतं.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला सामना, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, गॉल
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा सामना, 6 ते 10 फेब्रुवारी, गॉल
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), शॉन एबट, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, सॅम कॉन्स्टस, मॅट कुह्नेमन, मार्नस लबुशेन, जॉश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, टॉड मर्फी, नॅथन लायन, नॅथन मॅक्स्विनी, मिचेल स्टार्क, ब्यू वेब्स्टर आणि कूपर कोनोली.