लखनौ: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) टी-20 मालिकेत इशान किशन (Ishan kishan) संघर्ष करताना दिसला होता. पण काल श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने धमाकेदार फलंदाजी केली. इशानने श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढत त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं. सीरीजच्या पहिल्या सामन्यात इशानने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. इशानच्या दमदार फलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ (Srilanka Team) बॅकफूटवर गेला. इशान-श्रेयस अय्यरच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना 62 धावांनी जिंकला. इशानने त्याच्या 89 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार खेचले. या खेळीमुळे इशांत टी-20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकिपर बनला आहे. त्याने ऋषभ पंतला मागे सोडलं. इशानच्या या कामगिरीवर, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याने फलंदाजीत सातत्य दाखवावं, असं म्हटलं आहे.
यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशनला कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल, असं गावस्कर म्हणाले. इशान किशनच्या बॅटमधून निघालेले ड्राइव्हज, पुल फटक्यांचं गावस्करांनी कौतुक केलं. पहिल्या टी-20 सामन्यात कंडीशन्सची इशान किशनला मदत मिळाली, असं गावस्करांना वाटतं.
त्यावेळी लेंथ, वेग आणि बाऊन्स वेगळा होता
“इशान किशनने ज्या पद्धतीची फलंदाजी केली. त्यातून चांगले संकेत मिळाले. पण हा पहिलाच सामना होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये इशान किशनच्या फलंदाजीत सहजता दिसली नाही. त्यावेळी लेंथ, वेग आणि बाऊन्स वेगळा होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चेंडूचा बाऊन्स खांद्याच्या खाली रहात होता. त्यामुळे फलंदाजी करणं त्याला सोपं गेलं. पण म्हणून त्याने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या खेळीच महत्त्व कमी होत नाही. काही त्याचे ड्राइव्हज, पुलचे फटके खरोखर अप्रतिम होते. त्याने एका सामन्यात अशी कामगिरी केलीय. सातत्यासाठी अजून काही सामने वाट पाहूया” असे गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत इशान किशनने 85 च्या स्ट्राइक रेटने तीन सामन्यात 71 धावा केल्या. इशान किशन एक आक्रमक डावखुरा फलंदाज आहे. आगामी आयपीएलच्या सीजनमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
Sunil Gavaskar calls for consistency from promising youngster ishan kishan after knock vs SL